LIVE UPDATES

ठेकेदाराला वाचविण्‍यासाठी चुकीची उत्तरे नकोत

कणकवली पं. स. सभेत लक्ष्‍मण गावडेंनी सुनावले | जीर्ण वीज पोलांचा मुद्दाही चर्चेत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 02, 2026 14:21 PM
views 37  views

कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटीबंधारे नादुरुस्‍त स्‍थितीत असल्‍याने पाण्‍याची योग्‍य साठवणूक झाली नाही, असा आरोप पं. स. सदस्‍य लक्ष्‍मण गावडे यांनी केला. केवळ ठेकेदाराला वाचविण्‍यासाठी चुकीची उत्तरे संबंधित विभागाकडून दिली जात असल्‍याचा आरोपही गावडे यांनी केला. कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. सभेला सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरूण चव्‍हाण यांच्‍यासह पं. स. सदस्‍य व विविध खात्‍यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्‍थित होते.

कणकवली शहरातील कनकनगर, बिजलीनगर येथील केटी बंधारे नादुरुस्‍त असल्‍याने पाण्‍याची साठवणूक होत नसल्‍याची सूचना लक्ष्‍मण गावडे यांनी मांडली होती. त्‍यावर उत्तर देताना सदर बंधारे १५ ते १६ वर्षे जुने झाले असल्‍याने दुरुस्‍तीचे नियोजन करण्‍यात येत असल्‍याचे संबंधित विभागाकडून सांगण्‍यात आले. पण, या बंधार्‍यांमधून शेतकरी बांधवांंकडून पाणीचोरी होत असल्‍याने पाणी साठत नसल्‍याचे उत्तर मागील वेळी संबंधित विभागाकडून देण्‍यात आले होते. एकाच मुद्द्याबाबत वेगवेळी उत्तरे कशी? असा सवाल गावडे यांनी केला. त्‍यावर अधिकारी निरुत्‍तर झाले होते. ठेकेदाराने बंधार्‍यांना प्‍लेट्स व्‍यवस्थित बसविलेल्‍या नाहीत. तरीही त्‍याला वाचविण्‍यासाठी संबंधित विभागाने वेगवेगळी उत्तरे देऊ नयेत, असे गावडे यांनी सुनावले. 

देवगड  निपाणी राज्‍य मार्गावरील गटारांची कामे अपूर्ण स्‍थितीत असल्‍याचा मुद्‍ददा सभेत चर्चेत आला. मात्र, हा रस्‍ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अन्‍य विभागाकडे हस्‍तांतरीत केल्‍याची माहिती बांधकाम विभागातर्फे देण्‍यात आली. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या ताब्‍यातील अनेक रस्‍ते नादुरुस्‍त स्‍थितीत असल्‍याचे सदस्‍य पवन भालेकर यांनी सांगितले. तर पावसाळ सुरु झाला असून काही रस्‍त्‍यांचे डांबरीकरण सुरु असल्‍याचे लक्ष्‍मण गावडे यांनी सभागृहाच्‍या निदर्शनास आणून दिले. यावर सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांनीही सदर कामे पावसाळा सुरु होण्‍यापूर्वी होणे गरजेचे होते, असे सांगत नाराजी व्‍यक्‍त केली.

तालुक्‍यातील जीर्ण वीज पोलांचा मुद्‍दाही सभेत आला. ओझरम गावात १५ ते २० पोल जीर्ण असल्‍याचे सदस्‍य अण्‍णा खाडये यांनी सांगितले. नरडवे, दिगवळे, दारिस्‍ते, शिवडाव येथेही जीर्ण पोल असल्‍याचे सदस्‍या सायली कृपाळ यांनी सांगितले. एकट्या दिगवळे गावात ३२ पोल पडण्‍याच्‍या स्‍थितीत असल्‍याचेही कृपाळ यांनी सांगितले. ओझरम, दारूम गावांमध्‍ये गवारेडे, माकड हे भातशेतीचे नुकसान करत असल्‍याचा मुद्‍दा सदस्‍य सहदेव खाडये यांनी मांडला. मात्र, शेतकरी बांधवांनी नुकसानीबाबत तक्रार केली तर नुकसान भरपाई देण्‍याची तरतूद असल्‍याची माहिती वनविभागातफे देण्‍यात आली. एसटीच्‍या अनेक समस्‍या असल्‍याचा मुद्‍ददाही चर्चेत आला. डेपो मॅनेजर फोनच उचलत असल्‍याबाबत उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. सभेला अधिकारी न येता लिपीकांना पाठवले जाते, याबाबतही सदस्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. याबाबत डेपो मॅनेजर यांची भेट घेऊया असे, सावंत यांनी सुचविले.

तालुक्‍यातील एका शाळेच्‍या अनागोंदी कारभागामुळे दहावीच्‍या दहा मुलांचे भवितव्‍य धोक्‍यात आहे. कॉपीचा प्रकार घडल्‍यामुळे या विद्‍यार्थ्यांना गुणपत्रके मिळालेली नाहीत. वास्‍तविक त्‍या शाळेमध्‍ये ५० टक्‍के अभ्‍यास शिकवण्‍यात आलाच नव्‍हता. परिणामी विद्‍यार्थ्यांना कॉपी पुरवली गेली. त्‍यामुळे घडल्‍या प्रकाराला शाळाच जबाबदार असून या शाळेची मान्‍यता रद्‍द करावी, अशी सूचना लक्ष्‍मण गावडे यांनी केली.

तालुक्‍यात काही अंगणवाड्यांना रेन वॉटर हार्वेस्‍टिंग देण्‍यात आले आहेत. मात्र, कोकणात रेन वॉटर हार्वेस्‍टिंगची गरज काय? दुसऱ्या बाजूला अनेक जि. प. शाळांमध्‍ये वीजेची सोय नाही, तरीही टिव्‍ही देण्‍यात आले आहेत. ही टिव्‍ही नादुरुस्‍त होणार नाही काय? असा सवाल सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांनी अधिकार्‍यांना केला. तालुका आरोग्‍य विभागांतर्गत कर्मचार्‍यांच्‍या बदल्‍या झाल्‍या. परिणामी कर्मचारी कमी असल्‍याने एकाच कर्मचार्‍याकडे वेगवेगळ्या भागांचा पदभार दिला गेला आहे. वास्‍तविक पावसाळा सुरु झाल्‍याने साथरोग बळावू शकतात. अशा स्‍थितीत बदली झालेल्‍या कर्मचार्‍यांना येथून कसे सोडले? असा सवालही लक्ष्‍मण गावडे यांनी केला. मात्र, अनेक कर्मचारी बदली होऊन गेले, त्‍यांच्‍या जागी अनेक कर्मचारी रुजू देखील झाले, असा खुलासा तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. इंगवले यांनी केला.

इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळा सुरु झाल्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमध्‍ये विद्‍यार्थीसंख्‍या कमी होत चालली आहे. जि. प. च्‍या शाळांमध्‍ये सेमी इंग्रजी सुरु करावे, अशी सूचना सदस्‍या मानसी मराठे यांनी केली. तर तालुक्‍यात ५२ शाळांमध्‍ये सेमी इंग्रजी सुरु आहे. मात्र, त्‍यासाठी स्‍वतंत्र शिक्षकांची नेमणूक झालेली नाही, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्‍यात आली. पण, पटसंख्‍येबाबत शिक्षण विभागाने जागरूक असणे गरजेचे आहे, असेही मानसी मराठे यांनी सुचविले.