
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावर हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या विकास आराखड्यामुळे कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही. तसेच कुडाळ शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिली आहे. नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडताना नगरसेवक अभिषेक गावडे म्हणाले की, कुडाळ शहराचा विकास आराखडा हा नव्याने तयार करण्यात आलेला नसून, तो यापूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र, तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. आता पुढील वीस वर्षांच्या विकासाची दृष्टी ठेवून महत्त्वाचा असलेला हा आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला आहे. यामुळे नागरिकांना आपली मते, सूचना आणि हरकती नोंदविण्याची हक्काची संधी उपलब्ध झाली आहे.
विकास आराखडा जनतेपासून लपवून किंवा नागरिकांना अंधारात ठेवून मंजूर करण्यात आलेला नाही, असे गावडे यांनी स्पष्ट केले. उलट, नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊनच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या विषयावर उगाच कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आराखड्यातील विविध आरक्षणे, रस्ते, सार्वजनिक सुविधा किंवा इतर कोणत्याही बाबींविषयी नागरिकांना आक्षेप अथवा सूचना असल्यास त्या ८ जुलैपर्यंत नगरपंचायत कार्यालयात नोंदविता येणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाकडून केली जात आहे.
कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही या विषयात विशेष लक्ष घातले आहे. विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अन्याय होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग आणि त्यांचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा असून, तो घेतल्याशिवाय आराखडा पुढे जाणार नाही. त्यामुळे कुडाळकरांना आंदोलनाची पाळी येणार नाही, असा विश्वास अभिषेक गावडे यांनी शेवटी व्यक्त केला.










