
सावंतवाडी : शाळा, गाव आणि समाज यांचे आपण काहीतरी देणे लागतो या पवित्र भावनेतून, मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९८२- ८३ च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वृक्षारोपणाचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला. तब्बल ४३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश देत समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. शनिवार १३ जून २०२६ रोजी नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मळगावचे ग्रामदैवत श्री भूतनाथ मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी परिसरात १० माड (नारळ), २५ फोपळी (सुपारी) आणि २ सोनचाफे अशा विविध वृक्षांची रोपे लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. हा समाजोपयोगी उपक्रम सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. शरद शिरोडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद मोर्ये आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. नूतन बांदेकर यांच्या कल्पनेतून साकार झाला आहे. आपल्या मातृभूमीचे आणि शाळेचे ऋण फेडण्यासाठी व समाजाला काहीतरी चांगले देण्यासाठी आम्ही सर्व वर्गमित्रमैत्रिणींनी एकत्र येून हे विधायक कार्य हाती घेतले, असे प्रतिपादन डॉ. शरद शिरोडकर यांनी यावेळी केले. या उपक्रमाला सर्व माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला मळगाव देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या वेळी देवस्थानचे पदाधिकारी श्रीधर गावकर, काका गांवकर, गुरु गावकर, महेश गांवकर तसेच उदय सावळ, दिलीप खडपकर व भरत जाधव उपस्थित होते. देवस्थानचे पदाधिकारी गुरू गावकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या विधायक कार्याबद्दल सर्वांचे कौतुक करत हा आदर्श इतर आजी-माजी विद्यार्थ्यांनीही घ्यावा, असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद शिरोडकर, गोविंद मोर्ये, नूतन बांदेकर यांच्यासह सुनील गाड, रवींद्र माळकर, मानवेल डिसोजा, विजय हरमलकर, विश्वनाथ राऊळ, संजय धुरी, रामदास पांगम आणि शोभा कुडव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान केले. तसेच, या उपक्रमाला दिगंबर शेटकर, रवी मांजरेकर, रवींद्र मळगावकर, सुमन खडपकर, सुहासिनी सावंत, उषा राऊळ, नयन परब, रामा जाधव, रवींद्र प्रभू, मंदा नाईक, प्रशांत राऊळ, लक्ष्मण राऊळ, छाया नार्वेकर, शकुंतला नाईक आणि आरती नार्वेकर यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. ४३ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा देत, केवळ एकत्र न येता समाजाला थेट फायदा होईल असा निसर्गपूरक उपक्रम राबवल्याबद्दल मळगाव व परिसरातून या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक होत आहे.










