LIVE UPDATES

तिलारी घाटात अपघात

ट्रक दरीत कोसळता कोसळता वाचला
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 12:49 PM
views 267  views

दोडामार्ग : तिलारी घाट उतरत असताना एका मालवाहू ट्रकला तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ट्रक संरक्षक कठड्याला धडकल्याने तो खोल दरीत कोसळण्यापासून वाचला आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

संबंधित मालवाहू ट्रक घाटमाथ्यावरून गोवा राज्याच्या दिशेने माल घेऊन जात होता. तिलारी घाटातील तीव्र उतार, अरुंद रस्ता आणि यू-आकाराच्या धोकादायक वळणाचा अचूक अंदाज चालकाला न आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक रस्त्यालगत असलेल्या संरक्षक कठड्याला धडकला. या धडकेमुळे ट्रक थांबला; अन्यथा तो खोल दरीत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर ट्रक आडवा होऊन संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

विशेषतः एसटी बससह मोठ्या वाहनांची वाहतूक बंद पडली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही प्रवाशांनी आपला प्रवास सुरू ठेवण्यासाठी वाहनातून उतरून पायी मार्गक्रमण केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. काही काळ वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.