
कणकवली : शासनानच्या वतीने जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 'जलसिंधू' या निवासी संकुलाचा सुसज्ज प्रकल्प कलमठमध्ये साकारणार आहे, ही आनंदाची बाब आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे हे सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेतीलच. मात्र, जिल्हयातील सर्वच प्रलंबित प्रकल्प गतिमानरित्या पूर्ण करावेत, अशी सूचना पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्यातर्फे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी उभारण्यात येणार्या निवासी संकुलांच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, पं. स. सभापती हर्षदा वाळके, पं. स. उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री, पं. स. सदस्य गुरुनाथ वर्देकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.
यावेळी राणे यांनी जलसंपदा विभागातील अधिकार्यांना काही टोलेही लगावले. सिंधुदुर्ग ग्रामीण भाग असल्याने येथे अधिकारी यायला बघत नाहीत. पण, अशी निवासी संकुले झाली तर येथे अधिकार्यांची पदे शंभर टक्के भरतील. अगदी शनिवार, रविवार देखील अधिकारी इथेच राहतील, अशी कोपरखळी राणे यांनी मारली. एकवेळ धरणांची कामे उशिरा होतील. पण, स्वत:साठी असलेला हा निवासी संकुल प्रकल्प तुम्ही नक्कीच पूर्ण कराल, असेही राणे मिश्किलरित्या म्हणाले. मात्र, या निवासी संकुलाचा फायदा जिल्ह्ययाच्या विकासाला होईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.











