LIVE UPDATES

शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या

बाजारपेठेसह दोन्ही प्रवेश द्वारांवर 'ट्राफीक जाम' | अतिरिक्त वाहतूक पोलिसांची गरज
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 25, 2026 15:22 PM
views 17  views

सावंतवाडी : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून यामुळे दैनंदिन प्रवास करणारे वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिक पुरते त्रासून गेले आहेत. शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरेशी पावले उचलली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गवळी तिठा, बांदा नाका अन् मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी बघता अतिरिक्त वाहतूक पोलिसांची सावंतवाडी शहरासाठी आवश्यकता असल्याचेही दिसत आहे. 

शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या शिवाजी चौक गवळीतीठा या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अत्यंत वर्दळीच्या अशा या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस तैनात नसल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. शिवाजी चौकाव्यतिरिक्त गांधी चौक, जयप्रकाश चौक, नगरपरिषद समोरील मार्ग आणि फिश मार्केट, मिलाग्रीस चर्च या प्रमुख भागांमध्येही दररोज वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. गवळी तिठा इथे एसटीसह लक्झरी बसेस ये-जा असते. यात पर्यटकही येत असल्याने कोंडी होत आहे. बाजारपेठेत पादचारी मार्गाचे काम सुरू असून बेशिस्त पद्धतीने दुतर्फा होणारी वाहनांची पार्किंग याचे मुळ ठरते. त्यात एसटी बस आल्यानंतर आणखीनच अडचण निर्माण होते. चिटणीस नाका ते तिनमूशी पर्यंतच्या भागात यामुळे वाहतूक खोळंबलेली दिसते. तसेच सीएनजीसाठी बांदा नाका परिसरात लागणाऱ्या वाहनांच्या रांगामुळे गरड ते पेट्रोल पंप भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे शहराच्या दोन्ही प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडीचा अनुभव येतो.  त्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेला काटकसरीने वागण्याचे आणि संसाधनांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील या वाहतूक कोंडीत वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर इंधनाचा अपव्यय होत आहे. यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, या समस्येबाबत बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आम्ही शिवाजी चौक आणि शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा केली होती. विशेषतः शिवाजी चौक येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेच्या भागातील ही वाहतूक कोंडी प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावी आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता सावंतवाडीतील नागरिकांमधून जोर धरत आहे. तसेच वाहतूक कोंडीची समस्या बघता अतिरिक्त वाहतूक पोलिस सावंतवाडीत नेमणूक करण्याची मागणी होत आहे.