LIVE UPDATES

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईची मागणी

Edited by: लवू परब
Published on: May 25, 2026 15:57 PM
views 24  views

दोडामार्ग : राज्यात आणि देशातील विविध भागांत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष दिनकर नानचे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये बाहेरील व्यक्तींची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याबरोबरच सामाजिक स्थैर्य व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय अथवा संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात यावी, बांधकाम मजूर, फेरीवाले आणि इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या सुरक्षिततेचा आणि देशहिताचा विचार करून प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी संतोष नानचे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत दोडामार्ग व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, सुनिल म्हावळणकर, प्रणय मोरजकर आदी उपस्थित होते.