सावंतवाडीत गोवंश मांस साठवल्याप्रकरणी दोघांना अटक

८० किलो मांस जप्त
Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2025 15:58 PM
views 51  views

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरातील एका घरात गोवंश सदृश्य मांस आणि गांजा साठवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ८० किलो गोवंश सदृश्य मांस जप्त केले असून, याप्रकरणी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५) आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा (वय ४०) या दोघांना ताब्यात घेतले आहे.


सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, जयेश खंदरकर, पीएसआय माधुरी मुळीक यांच्यासह सुमारे १५ अंमलदारांच्या पथकाने संशयित घर असलेल्या परिसरावर निगराणी ठेवली. घराची झडती घेण्यासाठी पोलीस पोहचले असता, घरातील व्यक्तींनी सुरुवातीला दरवाजे उघडण्यास नकार दिला. यावेळी पोलिसांनी आपल्या जीपवरील अनाउन्स सिस्टीमचा वापर केला. पोलिसांनी त्यांना कायदेशीर प्रक्रियेने काम करत असल्याचे सांगून, दरवाजा न उघडल्यास दरवाजे व खिडक्या तोडून घरात प्रवेश करावा लागेल, असे जाहीर केले. यानंतर संशयितांनी दरवाजा उघडला.


दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये घरात सुमारे ८० किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस मिळून आले. पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या मासाचा पंचनामा केला. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा याच्या घरातून ८० किलो मांस, एक मोठा फ्रीझर, वजनकाटा, मांस कापण्याचा चाकू आणि प्लॅस्टिक पिशव्या असे साहित्य जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ७५ वर्षीय हसीना भाऊद्दीन ख्वाजा यांची देखील चौकशी केली जात असल्याचे समजते.