
कुडाळ: सरंबळ-परब पुजारेवाडी येथील सुहास सुरेश सुर्वे यांच्या घरी सोमवारी भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास सुरेश सुर्वे (वय ३२) यांचे घर सोमवारी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत अज्ञात चोरट्याने फोडले. चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ऐवज लंपास करण्यात आला.
दुपारी कामावरून परतलेल्या सुर्वे कुटुंबियांना कपाट उघडे दिसताच चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि त्यांनी तात्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली.
सुरुवातीला दाखल तक्रारीत, चोरट्याने रोख ५ हजार रुपये, सोन्याचे मंगळसूत्र, दोन अंगठ्या, नेकलेस, साखळी, चार बांगड्या, मुहूर्त मणी तसेच चांदीच्या पैजणासह एकूण सुमारे ११ तोळे सोने (जुन्या दरानुसार १ लाख ६७ हजार रुपये) आणि रोख ५ हजार असा एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे म्हटले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, हवालदार सचिन गवस यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान सुमारे ५०० मीटरपर्यंत तेथील ओढ्यापर्यंत जाऊन घुटमळले. तसेच ठसेतज्ज्ञांनाही बोलावले गेले, मात्र व्यवस्थित ठसे मिळाले नसल्याचे समजते.
तपासात १६ तोळे दागिने सुरक्षित आढळले: रात्री उशिरा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहकाऱ्यांनी पुन्हा सुर्वे कुटुंबियांच्या घरी भेट दिली आणि घटनास्थळावरील कपाटाची कसून तपासणी केली. या तपासणीत, कपाटातील कप्यांच्या आतमध्ये १६ तोळे सोने सुरक्षितरित्या सापडले. मात्र, बाहेरच्या कप्प्यात ठेवलेले सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. सुर्वे कुटुंबिय घरातून बाहेर गेल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार दर्शन सावंत करत आहेत.