
कणकवली : कणकवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम (वय ६७, गाव - वळीवंडे - देवगड) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, भाऊ असा परिवार आहे.
रघुनाथ कदम हे वळीवंडे गावी मुंबईहून आले होते. त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात स्वतःहून ते दाखल झाले. मात्र तिथेच त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह मुंबई येथे हलविण्यात आला असून उद्या 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी मुंबई येथे त्यांचे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
सुमारे 45 वर्ष रघुनाथ कदम हे मुंबई आणि कोकणात प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने कार्यरत होते. सध्या त्यांची मुंबईच्या रंगभूमीवर कवी अजय कांडर लिखित युगानुयुगे तूच आणि कळत्या नकळत्या वयात ही दोन नाटके चालू आहेत. तर युगानुयुगे तूच हे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक मुंबई दूरदर्शननेही सादर केले होते.
'24 तास नाट्यवेडा ' अशी त्यांच्याबद्दलची मुंबईतील त्यांच्या रंगभूमी परिवारामध्ये ओळख होती. मुंबई डीलाई रोड येथील उत्कर्ष मंडळातर्फे त्यांनी आपल्या रंगभूमीच्या कामाला प्रारंभ केला. उत्कर्ष मंडळाच्या अनेक एकांकिका स्पर्धेचे आणि प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी करून मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीवर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन 1993 / 94 पासून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत झाले. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान,अक्षरसिंधु आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य नाट्य संस्थांची अनेक नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले असून या नाटकांना विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त झाले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकासाठी विद्यापीठाचे गोल मेडलही प्राप्त झाले होते. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने त्यांच्या दिग्दर्शनाखाली सादर केलेली नाटके लोकप्रिय झाली. त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये नाटकांना पारितोषिकेही प्राप्त झाली होती. गेले भजनाक पोहोचले लग्नाक हे प्रभाकर भोगले लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित नाटक अमाप लोकप्रिय झाले होते.
सिंधुदुर्ग रंगभूमीतर्फे रघुनाथ कदम यांना आदरांजली वाहण्यात आली असून एक सच्चा रंगभूमीचा पाईक हरवल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.