
सावंतवाडी : शहरात ५७ कोटी रुपयांच्या सुधारित नळपाणी योजनेची कामे आणि गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये एम. एन. जी. एल नॅचरल गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे आणि चर तात्काळ बुजवून रस्ते पूर्ववत करण्याच्या कामाला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्वतः उपस्थित राहून वेग दिला आहे.
गणेशोत्सवापूर्वी प्रभाग १० मध्ये नॅचरल गॅस पाईपलाईनच्या कामासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. मात्र, पावसाचा जोर कायम असल्यामुळे या खोदाईवर खडीकरण आणि डांबरीकरण करणे शक्य झाले नव्हते. आता पाऊस ओसरताच उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी पुढाकार घेत आपल्या प्रभागात रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. डांबरीकरणाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी ते स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक विलास जाधव आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात सध्या ५७ कोटी रुपयांची सुधारित नळपाणी योजना राबवली जात आहे. मात्र, या कामाबाबत सातत्याने अनियमिततेच्या तक्रारी समोर येत आहेत. नगर परिषद आणि कंत्राटदार यांच्यात झालेल्या करारानुसार काम झाले नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.शहरातील नळपाणी योजनेचे काम अत्यंत दर्जेदार आणि उत्कृष्ट व्हावे यासाठी ते स्वतः प्रयत्नशील आहेत. ज्या ठिकाणच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये किंवा तांत्रिक बाबींवर शंका आहे, त्या संपूर्ण कामाचे तातडीने 'फेर सर्वेक्षण' करावे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नळपाणी योजनेच्या कामातील अनियमितेबाबत भाष्य करताना ॲड. निरवडेकर यांनी सांगितले की, "थर्ड पार्टी ऑडिट" ची जबाबदारी असणारे तज्ज्ञ प्रा. नारायण हेडाव यांनी स्वतः सावंतवाडीत उपस्थित राहून प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी. या कामामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने चर आणि खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.








