
सावंतवाडी : शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा मुद्दा मागील बैठकीत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर यांनी उपस्थित केल्यानंतर शुक्रवारच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्या निकृष्ट धान्याचा लॅब रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्यावरून पुन्हा गाजला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी धान्य चांगले आहे, असा अहवाल असल्याचे सांगताच श्री. गांवकर हे पुन्हा आक्रमक झाले. कीड लागलेले धान्य मी माझ्या घरातून आणलेले नव्हते. मग, लॅब रिपोर्ट पाॅझिटिव्ह कसा? सवाल करत हा रिपोर्ट खोटा असून अधिकारी आणि कंत्राटदाराच्या साटेलोट्यामुळेच असा बनावट रिपोर्ट आल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा येथील तालुका स्कूल इमारत सभागृहात सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहीजे असे सांगत उपसभापती गौरव मुळीक यांनी गटशिक्षणाधिकारी श्री. शेर्लेकर यांना चांगलेच धारेवर धरले. तर सभापती सुस्मिता जाधव यांनी हा लॅब रिपोर्ट अमान्य आहे असा ठराव घेण्यात येईल, शिवाय ते धान्य पुन्हा शासकीय व खासगी लॅबमध्ये तपासले जाईल अशी ग्वाही दिली.
सभेच्या सुरूवातीलाच इतिवृत्त वाचनात मागच्या सभेतील निकृष्ट धान्यबाबत विषय आला. यावर ते धान्य लॅब रिपोर्टमध्ये खाण्यायोग्य असल्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. शेर्लेकर यांनी स्पष्ट केले असता सदस्य जितेंद्र गावरकर पुन्हा आक्रमक झाले. "सभागृहात प्रत्यक्ष दाखवलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि किडलेले असताना, कागदावर ते चांगले कसे काय ठरवले गेले ? असा थेट सवाल श्री. गांवकर यांनी केला.
सदस्यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. तक्रारदार मी स्वतः असताना आणि प्रत्यक्ष पुरावा सभागृहात सादर केला असताना असा रिपोर्ट येतोच कसा ? कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक साटेलोट्यामुळे असा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे असा आरोप सदस्य श्री. गांवकर यांनी करत अशा निकृष्ट धान्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असताना आम्ही त्यांना शाळेत कसे पाठवायचे ? हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा दिला.
सदस्यांनी देखील या मुद्द्यावरून शिक्षण विभागाला धारेवर धरले. सभापती जाधव यांनी यात हस्तक्षेप करत ते निकृष्ट धान्य पुन्हा लॅबला पाठवले जाईलष त्याची पुन्हा तपासणी करून घ्यावी असे आदेश दिले. सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटला त्याबद्दल माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी सभेत सदस्य मायकल डिसोजा यांनी केली. त्यावर सभापती जाधव यांनी हा अत्यंत महत्वाचा ठराव आहे, हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागला हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे ठराव घेतला जावा असे आदेश दिले.
त्याला उपसभापती गौरव मुळीक यांनी आक्षेप घेत जागेचा प्रश्न राजघराण्यामुळे सुटला त्यांनी मोफत जागा दिली त्याबद्दल राजघराण्याच्या अभिनंदनाचा ठराव घ्या असे सुचवले. यावर सदस्य जितेंद्र गावकर यांनी हॉस्पिटलचा प्रश्न महत्त्वाचाच आहे त्यात कोणतेही राजकारण नको. मात्र, हा ठराव घेण्यापूर्वी जागा नेमकी कोणी दिली याचा अभ्यास करा ती जागा नेमकी शासनाची की राजघराण्याची यात विसंगत माहिती आहे, असे सांगितले. यावर सदस्य मायकल डिसोजा यांनी ती जागा शासनाची आहे असे सांगितले. पुन्हा उपसभापती यांनी यात उडी घेत राजघराण्याने जागा विनामूल्य दिली असे सांगितले. त्यामुळे सभापती सुस्मिता जाधव यांनी यात पुन्हा हस्तक्षेप करत आता या मुद्यावरून पुन्हा वाद नको दोघांचेही अभिनंदन ठराव घेऊया असे सांगितले.
पंचायत समिती मासिक सभेत नाणोस पुलाला तडे गेल्याच्या प्रश्न पुन्हा आयत्या वेळच्या विषयात आला. यावेळी उपअभियंता अजित पाटील यांनी ठेकेदार याला नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे सांगत एक्सपार्ट टिमच्या अहवाल नंतर त्याची डागडुजी केली जाईल अशी माहिती दिली. यावर उपसभापती मुळीक यांनी आम्हाला डागडुजी नको. तेवढा पूल नवीन उभारून दिला जावा अशी मागणी केली. यावर निधीची तरतूद करून प्रस्ताव सादर करा, नवीन भाग पुलाचा उभारण्यात यावा असा ठराव घेण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित रहात नसल्याच्या कारणावरून सदस्य नाराज झाले. सदस्य सदाशिव राणे व महेश धुरी यांनी हायवे विभागाच्या ठेकेदाराचे काम निकृष्ट असून इन्सुली खामदेव नाका येथील पूलाला भेगा पडल्या आहेत. त्यावर मलमट्टी केली गेली सातत्याने या पुलावर अपघात होऊन कित्येक जीव गेले आहेत अशी माहिती सभेत दिली. यावर उपसभापती मुळीक यांनी झाराप हायवेचे काम देखील अशाच निकृष्ट पद्धतीने झाले आहे. त्यामुळे पुढील बैठकीस त्यांना बोलवा असे आदेश दिले. त्या ठेकेदार याला काळ्या यादीत टाका अशी मागणी सदस्यांनी सभेत केली. इको सेन्सेटिव्ह झोन नको असलेल्या ग्रामपंचायतींनी तसे ठराव ग्रामसभा घेऊन लवकर घ्यावेत तशी कल्पना दिली जावी असा ठराव घेण्यात आला.
शासनाच्या सावंतवाडी येथे आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात पंचायत समिती लोकप्रतिनिधी सदस्य यांचा अपमान झाला. त्यांना खाली बसवण्यात आले, हा लोकप्रतिनिधी यांचा अपमान आहे. त्यामुळे तहसीलदार याना पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने समज देण्यात यावी ज्या व्यासपीठावर आम्हाला बोलविण्यात आले होते. तिथे सदस्यांना खुर्च्यांच उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे हा आमचा अपमान आहे असे सदस्य जितेंद्र गावकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात ग्रामपंचायती मध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यात ग्रा प मध्ये ही प्रणाली कधी बसवली जाईल ? असा मुद्दा सदस्य उदय पारिपत्ते यांनी उपस्थित केला. याबाबत लवकरच ग्रा.प ना पत्र पाठवून निर्णय घेण्याचे आश्वासन बीडीओ निलेश जाधव यांनी दिले. एकात्मिक बाल विकास विभागातर्फे गरोदर माता कुपोषित बालक यांना दिला जाणारा पोषण आहार त्याची देखील गुणवत्ता तपासण्यात यावी अशी मागणी सभेत करण्यात आली. गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरणे व झाडांची फांदी तोडून घेण्यात यावी अशी मागणी सभेत सदस्यांनी केली.










