
सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या राजकारणातील नाईक-राणे संघर्षाला पुन्हा एकदा धार आली असून, २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पडद्यामागे झालेल्या राजकीय घडामोडींवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले आहेत.
माजी आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते, असा थेट गौप्यस्फोट आमदार नीलेश राणे यांनी केला. इतकेच नव्हे, तर ‘एबी फॉर्म घेऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यापर्यंत सर्व काही ठरले होते’, असा दावा आमदार निलेश राणेंनी केला.
वैभव नाईक अँटीचेंबरमध्ये येऊन बसायचे. सगळ्यांचा संपर्क होता. सगळे बोलायचे. ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं. राणेंच्या या दाव्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर वैभव नाईक यांनीही आक्रमक भूमिका घेत, “ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं. गद्दारकीचा कलंक नको होता,” असे सांगत शिंदे गटात न जाण्यामागचे कारण स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी आमदार नीलेश राणे यांनी आमदारकीसाठी भाजप सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा पलटवार केला. एकनाथ शिंदे यांनी मला अनेकवेळा बोलावले होते. पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचे नव्हते.
म्हणून मी शिंदेंसोबत गेलो नाही. मंत्री भरत गोगावले शिंदे शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला होता. मात्र, मला गद्दारकीचा कलंक नको होता,असे म्हणत आपण तो प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आमदारकीसाठी नीलेश राणे यांनीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तसेच भविष्यात नीलेश राणे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून कुडाळमधून निवडणूक लढवतील, असा दावाही नाईकांनी केला.
वैभव नाईकांच्या या सर्व आरोपांना आमदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली आहे. वैभव नाईकांचा हा ‘२०२६चा सर्वात मोठा विनोद असल्याची टिका केली आहे. निलेश राणे म्हणाले, माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान. याला आता जिल्ह्यात कुत्रं उभं करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे, याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील.आणि हो रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जग जाहीर आहे असा टोलाही लगावला.










