LIVE UPDATES

वेंगुर्ल्यात विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक

३० लाख ९३ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त; श्रीराम कृषी केंद्राच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 12:04 PM
views 91  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरातील तुळस रोड परिसरात विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक करून विक्री केल्याप्रकरणी श्रीराम कृषी केंद्राशी संबंधित रामराजा सुरेश लामकाणे यांच्याविरुद्ध वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २६ प्रकारची कीटकनाशके, एकूण १,६१४.७५ किलो/लिटर साठा, अंदाजे ३० लाख ९३ हजार ४१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला शहरातील तुळस रोड, राजवाडा, नायरा पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. याबाबत प्रकाश मोहिते, कृषी अधिकारी, गुणनियंत्रण, वेंगुर्ला यांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कृषी विभागाच्या पथकात प्रकाश मोहिते, राहुल माने (जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख), सुशांत भोसले (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक) आणि पंकज पाटील (कृषी सेवक) यांचा समावेश होता.

फिर्यादीनुसार, वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील तुळस रोड परिसरात श्रीराम कृषी केंद्राच्या जवळ तसेच विक्री केंद्रासमोरील भागात किटकनाशकांचा साठा करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. रस्त्याच्या तुळसकडे जाणाऱ्या बाजूस लोखंडी गेटपासून सुमारे ५० मीटर अंतरावरील एका मांगरामध्ये किटकनाशकांचा साठा विनापरवाना करून ठेवण्यात आल्याचे आढळले.

पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी किटकनाशकांची साठवणूक व विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच विहित नमुन्यातील साठा रजिस्टर, खरेदी बिले आणि विक्री बिले उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले. विक्री केंद्राच्या दर्शनी भागात किटकनाशकांची नावे व दर दर्शविणारा आवश्यक फलकही लावलेला नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

या कारवाईत विविध कंपन्यांची एकूण २६ प्रकारची कीटकनाशके आढळून आली. त्यांचा एकूण साठा १,६१४.७५ किलो/लिटर असून त्याची एकूण किंमत तब्बल ३० लाख ९३ हजार ४१५ रुपये आहे. हा संपूर्ण मुद्देमाल कृषी विभागाच्या पथकाने जप्त केला आहे.

महाराष्ट्र राज्यात कीटकनाशकांची साठवणूक व विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना घेणे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित ठिकाणी विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक करून विक्री केल्याचे आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

वेंगुर्ला तालुक्यात यंदाच्या हंगामात बेकायदेशीर खत व कृषी निविष्ठांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाकडून कारवाई सुरू असून, कीटकनाशकांच्या विनापरवाना साठवणुकीवर झालेली ही कारवाईही त्याच मोहिमेचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात विनापरवाना कीटकनाशकांचा साठा आढळल्याने कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व अधिकृत कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि बेकायदेशीर विक्रीला आळा बसावा, यासाठी कृषी विभागाच्या पथकांकडून तपासणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वेंगुर्ला पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे.