
सावंतवाडी : सावंतवाडीच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावं. विकासाच्या मुद्द्यावर आपली स्पर्धा ही विकसित शहरांशी व्हावी. या मुद्द्यावर आपल्यातील स्पर्धा राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून एकत्र यावे, राजकारण निवडणूकीपुर्ते तर समजकारण अधिक करण्यावर भर द्यावा असे आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले. तर गणेशोत्सवाच्या भव्यतेमागे दडलेल्या अनेक हातांच्या समर्पणाचा आज गौरव झाला असून या सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समितीने केलेला सन्मान कौतुकास्पद आहे अशी भावना श्री. परब यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवासाठी मेहनत घेणाऱ्या मूर्तीकार, रांगोळीकार, सजावट, कारपेंटर, भजनी मंडळ, फुगडी मंडळ, कीर्तनकार बुवा, चित्रकार, रंगकार, तबला वादक, पेटी वादक, गायक, स्वर गायत्री, सूर संगमकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मोदक, मिठाई, फुले, हार यांची विविध मांडणी गणेशोत्सव काळात करणाऱ्या कलावंताचे सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, तबला वादक बंड्या धारगळकर, ज्येष्ठ मुर्तीकार विलास मांजरेकर, संगीत वादक तथा शिक्षक शेख गुरुजी, आरोग्य निरीक्षक दीपक म्हापसेकर, संगीत विशारद मंजिरी धोपेश्वरकर, अजय जाधव व कबड्डी टीम, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे, ज्येष्ठ क्रीडापटू वसंत जाधव आदींचा 'सिंधुदुर्ग रत्न' पुरस्काराने.
‘श्री गणेशोत्सव २०२६’ कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, अजय गोंदावळे, दिपाली भालेकर आदींसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.
मान्यवरांच्या हस्ते गणेश मूर्तिकार, भजनी मंडळांचे कलाकार, गायक, होमगार्ड, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डेकोरेटर्स, महिला मंडळ तसेच गणेशोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सभापती दिपाली भालेकर, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, नगरसेवक देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, किर्ती बोंद्रे, हितेन नाईक, बापु सावंत, वसंत जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर, ॲड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, विजय पेडणेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.










