LIVE UPDATES

सिंधुदुर्गात ग्रामीण सहकार संवादचे आयोजन

RBI चे संचालक सतीश मराठे यांचे मार्गदर्शन ; २३ ऑगस्टला ओरोस येथे चर्चासत्र
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 18:44 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण सहकार संवाद’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक  २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, ओरोस, सिंधुदुर्ग येथे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांसमोरील वर्तमान समस्या, नव्या संधी, संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दिशा, बदलत्या आर्थिक परिस्थितीतील आव्हाने तसेच सहकारातून ग्रामीण विकासाला मिळणारी नवी गती यावर या संवादामध्ये मार्गदर्शन व विचारविनिमय होणार आहे. शेती, मत्स्य, काजू, दुग्ध, पर्यटन, ग्रामीण उद्योग तसेच विविध सहकारी संस्थांना भविष्यात अधिक सक्षमपणे वाटचाल करण्यासाठी या संवादातून निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.

या कार्यक्रमात कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सतीश मराठे, संचालक,रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व संचालक नाबार्ड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  मनीष दळवी राहणार आहेत. तसेच अतुल काळसेकर, उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आणि धनंजय यादव, संचालक, महाराष्ट्र राज्य काजू महामंडळ तथा सहकार भारती कोकण विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर प्रत्यक्ष संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि विकासाच्या नव्या संधींचा वेध घेणारा हा कार्यक्रम जिल्ह्यातील सहकारी संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.“एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या सहकाराच्या मूलमंत्रातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आयोजित या ‘ग्रामीण सहकार संवाद’ कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद, सहकारप्रेमी आणि संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  मनीष दळवी आणि सहकार भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित आवटे यांनी केले आहे.