
सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांनाही आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत गावागावात विशेष आधार सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागरिकांना आधार सेवेसाठी दूरच्या ठिकाणी जावे लागू नये, त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाचावा तसेच आवश्यक सेवा गावाच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या विशेष शिबिरांमध्ये उपलब्ध सुविधांनुसार आधार नोंदणी, आधारमधील आवश्यक दुरुस्ती व अद्ययावत सेवा तसेच इतर आधारविषयक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतींना विशेष आवाहन
ज्या गावांमध्ये विशेष आधार सेवा शिबिर आयोजित करावयाचे आहे, त्या गावांच्या सरपंचांनी डाकघर अधीक्षक, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी – 416812 यांच्याकडे पत्राद्वारे किंवा dosindhudurg.mh@gmail.com या ई-मेलवर दि. 5 सप्टेंबर 2026 पर्यंत कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना या शिबिरांचा लाभ मिळेल, यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग डाक विभागाचे डाकघर अधीक्षक श्री. एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 8668890125 / 9823753642 या क्रमांकांवर संपर्क साधावा.










