LIVE UPDATES

धाटाव औद्योगिक वसाहतीतील अवैध पार्किंगवर मनसे आक्रमक

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 02, 2026 13:26 PM
views 39  views

रोहा | रुपेश रटाटे : धाटाव एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या अवैध पार्किंगच्या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहने आणि घातक रसायने भरलेले टँकर उभे राहत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने सार्वजनिक रस्त्यांचा पार्किंगसाठी होणारा वापर त्वरित बंद करून सर्व वाहनांचे पार्किंग संबंधित कंपनीच्या आवारातच करण्यात यावे, अशी ठाम भूमिका घेतली.

या संदर्भात दि. २९ जून रोजी रोहा पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन, कंपनी व्यवस्थापन आणि मनसे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत अवैध पार्किंगचा प्रश्न गांभीर्याने घेत योग्य तो कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आले.

बैठकीस उपनिरीक्षक सलमान खतीब, गोपनीय अमलदार याकूब तडवी, औद्योगिक क्षेत्राचे ज्युनिअर इंजिनिअर विनीत कांदलगावकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर, रोहा तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे तसेच मनसेचे पदाधिकारी आणि विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. अवैध पार्किंगमुळे निर्माण होणारा अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने प्रभावी उपाययोजना करून औद्योगिक परिसरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिक व कामगारांकडून होत आहे.