
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील नूतन विद्यालय कळणे या प्रशालेत सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अंकुश नाईक, शिपाई अंकिता वेंगुर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम तसेच व्यसनामुळे विद्यार्थ्यांना होणारे भविष्यातील धोके, या घडत्या वयात विद्यार्थ्यांनी योग्य संगत बाळगून वाईट संगती पासून आपला कसा बचाव करायला हवा यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी घेण्यात आलेल्या व्यसनमुक्ती चित्रकला स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थिनी योगिता अप्पाजी गवस प्रथम क्रमांक, गणेश विजय गवस द्वितीय क्रमांक तर शमिका मिलिंद देसाई तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत प्रशालेतील पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ, शिक्षक संजय तायवाडे, निकिता सावंत, सतीश धर्णे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामार्फत राबवण्यात येणाऱ्या या व्यसनमुक्ती मोहिमेत दोडामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी उत्तम नियोजन करून दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शाळा स्तरावर हा उपक्रम घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सतीश धर्णे यांनी मानले.










