
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी साझांच्या पुनर्रचनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील आंबेरी, गांधीनगर आणि आमवणे या गावांचा संबंधित तलाठी साझांमध्ये समावेश करून साझांची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अंतिम अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार पुढील बदल करण्यात आले आहेत.
१. आंबेरी गावाचा वाडोस साझामध्ये समावेश : तुळसुली कर्याद नारूर तलाठी साझातील आंबेरी गावाचा वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे.
२. गांधीनगर गावाचा पाट साझामध्ये समावेश : हुमरमळा तलाठी साझातील गांधीनगर गावाचा पाट तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे.
३. आमवणे गावाचा किर्लोस साझामध्ये समावेश : असरोंडी तलाठी साझातील आमवणे गावाचा किर्लोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे.
राज्यात वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ लक्षात घेऊन शासनाने तलाठी साझांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वीच्या २३६ तलाठी साझांमध्ये ९९ नवीन साझांची निर्मिती करून एकूण ३३५ तलाठी साझे निर्माण करण्यात आले आहेत.
तलाठी साझांचे मुख्यालय आणि त्यास संलग्न गाव यांमधील अंतर, उपलब्ध दळणवळण व्यवस्था तसेच ग्रामस्थांची सोय विचारात घेऊन ही पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४ च्या पोटकलम (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी ही अंतिम अधिसूचना जारी केली आहे.
ही अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तलाठी साझा आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.











