
कुडाळ : गोपुरी आश्रम आणि अनुभव शिक्षा केंद्र यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेला वाचन संस्कृतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. वाचन संस्कृतीच्या अग्रणी शिलेदारांपैकी सिद्धी आणि नताशा या दोघींनी उपस्थित राहून वाचन संस्कृती बद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. तसेच त्यांचे वाचन संस्कृतीचे अनुभव त्यांनी सर्वांसोबत सांगितले. यावेळी कवयित्री सरिता पवार आणि साहित्यिक मनीषा पाटील या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आपले बहुमूल्य विचार संवाद साधून व्यक्त केले.
काशिनाथ सर, गोपुरी आश्रमचे विनायक मेस्त्री यांनी विचार मांडताना पब्लिक बायोडायर्व्हसिटी रजिस्टर संबंधित कार्यशाळेबद्दल मेस्त्री यांनी माहिती दिली. या नंतर इट्स ओन्ली 47 डिग्री सेल्सिअस ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. क्लायमेट चेंज वरील ही शॉर्ट फिल्म सर्वांना खूपच भावली.
आपल्या मालवणी संस्कृतीवर आधारित गमन या चित्रपटाचे प्रमोशन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी गमनच्या गीतकार रूपाली कदम उपस्थित होत्या. गमन : म्हणजेच स्थलांतर कोकणाकडून शहराकडे हा विषय हृदयस्पर्शी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर पासून गमन आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन सर्वांनी नक्की पाहावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वाचन संस्कृतीचा पुढील कार्यक्रम रविवारी ४ ऑक्टोबर रोजी गोपुरी आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सर्व सहभागिनीं एखादे पुस्तक, लेख, कविता संग्रह, मुलाखत इ. वाचावे किंवा एखादी बोधपर शॉर्ट फिल्म, चित्रपट किंवा वेबसीरिज, पॉडकास्ट इ. काहीतरी पहावे आणि याबद्दल सर्वांसमोर कमीत कमी ५ मिनिट आपले विचार मांडायचे आहेत.











