
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठी राजकारणात नसून देश आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारे नेतृत्व पक्षाकडे आहे. राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भाजपचा कार्यकर्ता करतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच्या दिशेने कार्य करत २०४७ च्या विकसित भारत व महाराष्ट्राच्या ध्येयासाठी पक्षसंघटन अधिक मजबूत करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावकर, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोसले, विशाल परब, रणजीत देसाई, संदीप मेस्त्री, सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, केवळ केंद्रात म्हणजेच दिल्लीमध्ये सरकार असणे पुरेसे नाही; त्या सरकारच्या योजना आणि विकासाचा लाभ गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी पंचायत पातळीवर सक्षम संघटन आणि सक्षम लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर कार्यरत आहे. राज्यात लोडशेडींग बंद करण्यात आले असून 'हर घर जल' योजनेद्वारे घराघरांत पाणी पोहोचवले आहे. याशिवाय सौर ऊर्जेचा वापर आणि ई-२० सारख्या क्रांतिकारी संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. भाजप हा राष्ट्रहीत जोपासणारा पक्ष असून विरोधी पक्ष केवळ टीआरपी आणि फेक नरेटीव्हची लढाई लढत आहेत. मात्र, आपली लढाई २०४७ च्या विकसित भाजप आणि महाराष्ट्रासाठी आहे.
पक्षाने 'पार्लमेंट ते पंचायत' अशा सर्व स्तरांवर विजय मिळवला असून, भाजपची देशासाठी का गरज आहे हे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी भाजपने दिलेले योगदान आणि जिल्हा बँकेच्या विविध कल्याणकारी योजना जनतेला समजावून सांगितल्या पाहिजेत, असे त्य नमूद केले. सशक्त भारतासाठी सशक्त भाजप ही काळाची गरज असून, कार्यकर्त्यांनी त्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करावा, असे ते म्हणाले. विरोधकांच्या फेक नरेटीव्हला चोख उत्तर देण्याचे आवाहन करत रविंद्र चव्हाण यांनी सरकारची कामे अधोरेखित केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील ५६ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असताना मच्छीमारांना मात्र कर्जमाफीमध्ये सवलती देण्यात बंधन येत होती. अशावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरीत मंत्री नितेश राणे यांनी आपल्या समुद्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना शेतकरी म्हणून दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे, असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी काढले. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील ना. नितेश राणे अत्यंत प्रभावी काम करत असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी अधिक जोमाने पुढे जात आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.










