LIVE UPDATES

गणपतीपुळेत बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह सापडले

पोलिस अधीक्षकांनी नातेवाईकांचं केलं सांत्वन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 19:26 PM
views 104  views

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे काल बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह आज आढळले आहेत. काल एकाचा मृतदेह सापडला होता तर आज काल रात्रीपासूनच्या शोधमोहिमेनंतर आज सायंकाळपर्यंत आणखी चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस, कस्टम विभाग, जीवरक्षक, मच्छीमार आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव व शोधमोहीम राबविण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पीडित तरुणांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील १९ जणांचा समूह देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. पाच जण लाटांच्या तडाख्याने दिसेनासे झाले. या घटनेनंतर तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांच्यासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. कस्टम विभाग, मच्छीमार बोटी आणि स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

काल प्रेम दीपक आदमाने (वय १९) याचा मृतदेह सापडला. आज अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०) आणि हिमांशू रामेश्वर कांबळे (१९) व आदित्य संतोष राऊत (२२) यांचे मृतदेहही शोधपथकाच्या हाती लागले.

सावधगिरीचे आवाहन

सध्या समुद्रातील प्रवाह आणि लाटांची तीव्रता लक्षात घेता पर्यटकांनी समुद्रात उतरून स्नान करण्याचा मोह टाळावा, सुरक्षित अंतरावरूनच समुद्राचे सौंदर्य अनुभवावे आणि जीवरक्षक व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे