LIVE UPDATES

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 19:05 PM
views 35  views

कुडाळ : 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध विभागांच्या वतीने अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला आणि संपूर्ण जगाने स्वीकारलेला आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभर साजरा केला जातो. निरोगी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे आता जगाला पटले आहे. याच कारणास्तव जगातील बहुतांश सर्व राष्ट्रे या मोहिमेत सहभागी होत आहेत. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी योग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. याची माहिती आबालवृद्धांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शाळा, महाविद्यालये आणि विविध स्तरांवर योग दिनाचे आयोजन केले जाते.

याच दिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शैक्षणिक विभागांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला. यामध्ये बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेज, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, बॅ. नाथ पै आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महिला महाविद्यालय, बॅरिस्टर नाथ पै आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स रात्र महाविद्यालय, बॅरिस्टर नाथ पै ज्युनिअर कॉलेज, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा (YCMOU) योग डिप्लोमा व एम.ए. योग विभागाचा समावेश होता. सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने विविध योगासने व प्राणायाम केले.

याप्रसंगी प्राध्यापिका रिद्धी पाताडे आणि स्वाती देसाई यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी व सीमा राठोड यांनी केले. या योग दिन सोहळ्याला संस्थेच्या विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच रणजीत देसाई, गुरु देसाई यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.