LIVE UPDATES

स्मार्ट मीटरविरोधात ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक

जुने मीटर चोरीला गेल्याची तक्रार करणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 20:53 PM
views 108  views

सिंधुदुर्गनगरी : स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर रविवारी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर सभामंडपात वीजग्राहकांची बैठक पार पडली. या बैठकीत जुने वीजमीटर चोरीला गेल्याची अधिकृत तक्रार महावितरण तसेच पोलीस ठाण्यात देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीला ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, ज्या नागरिकांचे जुने वीजमीटर काढून नेण्यात आले आहेत, त्यांनी सोमवार, दि. २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता श्री देव रवळनाथ मंदिर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. संघटनेतर्फे संबंधित नागरिकांना अर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून ते भरून घेतल्यानंतर महावितरण व पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रार सादर केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

स्मार्ट मीटरविरोधातील लढा अधिक संघटितपणे उभारण्यासाठी ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहकांनी एकत्र येत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वीजग्राहकांच्या विविध शंका, आक्षेप आणि तक्रारींवर चर्चा करण्यात आली. वीजग्राहकांच्या हक्कांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

ओरोस पंचक्रोशी वीजग्राहक संघटना स्थापन

ओरोस, रानबांबूळी, कसाल, गावराई, पडवे व अणाव गावांतील प्रतिनिधींचा समावेश असलेल्या "ओरोस पंचक्रोशी वीजग्राहक संघटने"ची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी नागेश ओरोसकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी निखिल राणे, पुरुषोत्तम हरमलकर, वासुदेव कसालकर व सुभाष सावंत, सचिवपदी मदन परब, खजिनदारपदी सुहास परब, सहसचिवपदी उदय दळवी, सहखजिनदारपदी रेश्मा वेंगुर्लेकर तसेच कार्याध्यक्षपदी पांडुरंग मालवणकर यांची निवड करण्यात आली.

सदस्य म्हणून महादेव परब, देवव्रत वारंग, मिलिंद सोनवडेकर, सोनल पारकर, निलेश ओरोसकर, रसिका मुंज व प्रकाश सुद्रिक यांचा समावेश करण्यात आला आहे. संघटनेच्या माध्यमातून स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.