
रत्नागिरी : 'एड्स सुरक्षा' मोहिमेअंतर्गत निश्चित करण्यात आलेली ९५-९५-९५ ही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत रत्नागिरी जिल्ह्याने 'सुरक्षित' दर्जा पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचा येत्या १ डिसेंबर २०२६ रोजी 'जागतिक एड्स दिना'निमित्त नवी दिल्ली येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव ऋतू शर्मा (भा.रा.से.) यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ही आनंदाची बातमी दिली आहे. 'मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा' उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने गाठलेल्या या यशाबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय संपूर्ण आरोग्ययंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
दुर्दैवाने एचआयव्ही/एड्समुळे आपला जीव गमवावा लागलेल्या व्यक्तींना (PLHIV) हे यश समर्पित करण्यासाठी तसेच जिल्हाधिकारी व त्यांच्या पथकाने, ज्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon/CMHO/DMHO) आणि जिल्हा एड्स नियंत्रण अधिकाऱ्यांचा समावेश आहे—दिलेल्या अथक योगदानाची दखल घेऊन या सन्मानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे १ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या जागतिक एड्स दिन कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे निमंत्रण जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व प्रशासकीय सेवेत समाधानाचे आणि गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








