LIVE UPDATES

दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य

रिव्हर्स मायग्रेशनसाठी सिंधुदुर्गात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार | जहाजबांधणी उद्योगाला चालना देण्यावर भर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 29, 2026 08:31 PM
views 49  views

सिंधुदुर्गनगरी : रोजगाराच्या शोधात जिल्ह्याबाहेर गेलेला तरुण पुन्हा सिंधुदुर्गात परत यावा आणि जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ हे मिशन यशस्वी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सध्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये असून, त्यामध्ये दरवर्षी ५० हजार रुपयांची वाढ कशी करता येईल, याचा ठोस विकास आराखडा तयार करूया, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, महेश पोहनेरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रणय तेली, प्रसाद देवधर, संध्याकाळी तेरसे, महेश ठाकूर, अशोक सारंग, महेश गोखले यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.

पालकमंत्री राणे म्हणाले, जिल्ह्याचा विकास म्हणजे केवळ मोठी विकासकामे किंवा पायाभूत सुविधांची उभारणी नव्हे, तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे आणि त्याच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हे विकासाचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे. कृषी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रातील विकासाचा केंद्रबिंदू दरडोई उत्पन्नवाढ हाच असायला हवा. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्र येऊन विकासाच्या नव्या संकल्पना मांडाव्यात. पालकमंत्री म्हणून सरकारच्या माध्यमातून या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.

सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासासाठी पर्यटन, कृषी आणि मत्स्यव्यवसाय या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच औद्योगिक क्षेत्राचाही विस्तार होणे गरजेचे आहे. गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यात जहाजबांधणी उद्योग उभे करण्याची गरज असून, त्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. तळवणे येथे जहाजबांधणीचा प्रकल्प सुरू झाला असून, लवकरच देवगड येथेही असा प्रकल्प सुरू होणार आहे. जहाजबांधणी उद्योगात हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिरोडा येथील ताज हॉटेल प्रकल्प आणि कुणकेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल प्रकल्प हेही जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना देणारे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची कामे आता पूर्णत्वाकडे जात असून, त्या अधिक सक्षम करण्यासोबतच दर्जेदार रोजगारनिर्मितीवर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक उद्योजकांनी पुढे येण्याची गरज

जिल्हा बँकेकडून कर्ज घेणाऱ्या स्थानिक नवोदित उद्योजकांची संख्या आणि त्यांच्या कर्जाची मागणी तुलनेने कमी आहे. याउलट जिल्ह्याबाहेरील उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी केली जाते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. जिल्ह्यातील तरुणांनी उद्योग-व्यवसायासाठी पुढाकार घ्यावा, स्थानिक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारावेत आणि त्यातून रोजगारनिर्मिती करावी. जिल्ह्यात अनेक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्या कामाचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.