LIVE UPDATES

Sawantwadi News : ‘चितारआळीचा राजा’च्या ‘खेळ पैठणीचा’ला रंगतदार ठसका

विद्या मुद्राळे ठरल्या विजेत्या; प्रश्नावली, हास्यविनोद आणि रंगतदार रसीखेचीत रंगली स्पर्धा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 23, 2026 18:51 PM
views 28  views

सावंतवाडी : शहरातील ‘चितारआळीचा राजा’ गणेश मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हसत-खेळत, मनोरंजनाच्या वातावरणात रंगलेली ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगतदार ठरली.

स्पर्धेचे परीक्षक शुभम यांनी महिलांसोबत हसत-खेळत घेतलेल्या प्रश्नावलीमुळे कार्यक्रमात आणखी रंग भरला. त्यांच्या मिश्कील प्रश्नांना स्पर्धक महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम अक्षरशः उचलून धरला. स्पर्धकांच्या उत्साहाला उपस्थित रसिकांनीही दाद दिली.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. विविध फेऱ्यांनंतर अंतिम टप्प्यात तीन स्पर्धकांमध्ये चुरशीची रस्सीखेच पाहायला मिळाली. त्यामुळे विजेती कोण ठरणार, याची उत्सुकता उपस्थितांमध्ये निर्माण झाली होती.

अखेर या चुरशीच्या स्पर्धेत विद्या मुद्राळे मॅडम यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना प्रथम क्रमांकाची पैठणी प्रदान करण्यात आली. तर द्वितीय क्रमांकाची पैठणी गौरव दळवी यांच्या पत्नीला मिळाली. विजेत्या दोन्ही स्पर्धकांनी रसिकांसोबत आपला आनंद साजरा केला.

एकूणच, ‘चितारआळीचा राजा’च्या गणेशोत्सवातील ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम हास्यविनोद, उत्साह आणि मनोरंजनाने रंगून गेला. उपस्थित रसिकांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.