
सावंतवाडी : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम सावंतवाडी पोलीस ठाण्यात राबविण्यात आला. ''बंधन हेल्मेटचे, रक्षण जीवनाचे ; बंधन सिटबेल्टचे, रक्षण जीवनाचे'' असा संदेश या निमित्ताने वाहन चालकांना देण्यात आला.गांधी चौक येथे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांच्या व सीटबेल्ट न लावलेल्या चारचाकी वाहनचालकांच्या हातात पोलिसांकडून बॅण्ड बांधण्यात आले. तसेच रक्षाबंधन निमित्त लाडू देखील देण्यात आला. वाहतूकीचे नियम पाळा, घरी वाट पाहणार कुणीतरी आहे याची दक्षता घ्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यावेळी म्हणाले, रक्षाबंधन सणानिमित्ताने वाहन चालकांना जागरूक करण्याचे काम आम्ही केले. दुचाकी चालकांना हेल्मेट आणि कार चालकांना सीटबेल्ट वापराचे आवाहन केले. रक्षाबंधन निमित्त रक्षणाचा बॅण्ड देत घरी कुणीतरी वाट पाहत आहेत याची जाणीव आम्ही करून दिली. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्यावी, वाहतूकीचे नियम पाळावे. आज रक्षण बॅण्ड, लाडू देऊन सांगितले. उद्यापासून कारवाई करण्यात येईल असही पोलीस निरीक्षक यांनी म्हटले. गांधी चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माधुरी मुळीक, निलेश परब, आबा पिळणकर, अमित राऊळ, निलेश नाईक, मयुर सावंत, पोलीस पाटील संदेश राऊळ, रिक्षा संघटना अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव आदी उपस्थित होते.










