
मालवण : हेल्मेट घातलं नाही म्हणून दंडाची पावती मिळेल, अशीच सवय झालेल्या दुचाकीस्वारांना आज मालवण पोलिसांनी चक्क राखी बांधली! रक्षाबंधनाच्या निमित्ताने हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी अनोख्या पद्धतीने सुरक्षा संदेश दिला. हेल्मेट घालूनच बाहेर पडा, असा संदेश देत पोलिसांनी या अनोख्या कारवाईतून वाहनचालकांना सुरक्षिततेची जाणीव करून दिली.
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने "सुरक्षा राखी" हा नाविन्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक उपक्रम सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मालवण शहरात राबवण्यात आला. शहरातील देऊळवाडा येथील नाक्यावर हे जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी नियमबाह्यपणे दुचाकी चालवणाऱ्या, म्हणजेच हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी तसेच लोकप्रतिनिधींनी ‘सुरक्षा राखी’ बांधून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून दिले. तर दुसरीकडे, दुचाकी चालवणाऱ्या महिलांना गुलाब पुष्प देऊन हेल्मेट वापराबाबत आपुलकीने जनजागृती करण्यात आली.
जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित या उपक्रमात नगरसेविका नीना मुंबरकर यांनी स्वतः उपस्थित राहून वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधली आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने नागरिकांना कडक इशाराही दिला आहे. उद्यापासून शहरात दोनचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी वाहनचालकांसाठी सीटबेल्ट लावणे पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे वाहनचालक या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या जनजागृती मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक पंडीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जितेंद्र पेडणेकर, सुरज रेडकर, सुप्रिया पवार, रंजू डोये, संकेत तांडेल, राजाराम तेरेखोलकर, शशिशेखर प्रभू, आरती खोबरेकर, सोनाली पाटकर, भक्ती शिवलकर, ज्योस्त्ना पोखरे, दीपक गावडे, धनंजय निवतकर, गणेश माने तसेच जिल्हा वाहतूक पोलीस कर्मचारी महेंद्र देऊलकर, मंचकराव शिरडे आणि नागेश मालवे आदी अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










