सावंतवाडी : मे महिन्यातील कडाक्याचं ऊन अक्षरशः अंगाची लाहीलाही करते. याच तापलेल्या वातावरण अचानक दाटून येणारे ढग...सुटलेला गार वारा...काळ्या ढगांच्या आडून चमकणाऱ्या विजा यामुळे आल्हाददायक वातावरण तयार होतं. निसर्गाचंही मनमोहक रूप दिसून येतं. अशीच दृश्य होती सावंतवाडीत. दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने काहीसा शिडकावा केला आणि गरमीने हैराण झालेल्या सावंतवाडीकरांना थंडावा देऊन गेला.
मोती तलाव सावंतवाडीचं हृदय. पावसात हा परिसर आणखीन खुलतो. आताही दाटून आलेल्या काळ्या ढगांच्या विविध छटा त्यात अजूनच भर घालत होत्या. गडगडाट आणि चमकणाऱ्या विजा या दृशांना चारचांद लावत होत्या. त्यामुळे मोती तलावाचा परिसर चांगलाचं खुलून दिसत होता. नव्याने या मोती तलाव्याच्या प्रेमात पाडत होता.
दरम्यान, अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला. मोती तलावा काठची झाडे जोरातच हलू लागली. या वाऱ्यामुळे रस्त्यावरची धुळही उडू लागली. वाऱ्याने जोर पकडल्याने रस्त्यालगतचा पोलही कोसळला. त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण तयार झालं.
थोड्यावेळाने पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यामुळे ओल्या मातीचा सुगंध पसरला. तापलेले रस्ते ओलेचिंब झाले. वातावरणात गारवा पसरला. अशातच हळूहळू पुन्हा ऊन डोकावू लागलं. काही वेळासाठी का होईना सावंतवाडीकरांना अवकाळी पाऊस थंडावा देऊन गेला. यावेळी निसर्गाचे अद्भुत रूप डोळ्यात भरावं आणि मनात साठवावं असंच होतं आणि हो नव्याने या मोती तलाव्याच्या प्रेमात पाडणारंही...
ही सारी दृश्य टिपलीत आमचे व्हीडीओ एडिटर मयुरेश राऊळ यांनी...