दोडामार्ग : दोडामार्ग तालुका हा गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे गोवा राज्यातील अनेक नागरिक दोडामार्ग शहरात बाजारासाठी येजा करत असतात पण दोडामार्ग पोलिसांकडून या नागरिकांना नाहक त्रास देण्याचा प्रकार करीत आहेत. हे योग्य नसून यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून आपल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य ती समज वजा आदेश देण्यात यावेत अशी मागणी जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केली आहे.
म्हापसेकर बोलताना पुढे म्हणाले की, गोव्यातील काही युवकांना पोलिसांकडून दोडामार्ग बाजारपेठेत मारहाण करण्यात आली ती योग्य नाही. अशाप्रकारे जर पोलिसांनी आपली मुजोरी केली तर येथील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात दिवाळी सणा दिवशी नरकासूरच्या मोठ मोठ्या प्रतिमा तयार करण्यात येतात. व भव्य दिव्या स्पर्धा ही घेतल्या जातात त्याच दिवशी रात्र जागवून सकाळी नरकरासुराचे दहन केले जाते . या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजाररहाटासाठी येतात यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर जोर जबरदस्ती त्यांना मारहाण करणे योग्य नाही. आमच्या भागातील युवकही काम धद्यानिमित्त गोव्यात जातात. तेथील लोकांनीही किंवा पोलिसांनी आपल्या भागातील युवकांना अशाप्रकारे वागणूक दिल्यास त्यांना दोष देण्यात येऊ नये असेही म्हापसेकर म्हणाले. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी आपल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी म्हापसेकर यांनी केली आहे. यापुढे अशी प्रकरणे घडू नयेत याबाबतचीही काळजीही पोलिसांनी घ्यावी.
पोलिसांचाच अवैध धंद्यांना वरदहस्त
दोडामार्ग तालुक्यातील ३६५ ×२४ दिवस अवैध दारू विक्री, मटका, जुगार हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील पोलीस जर एवढेच कर्तव्यदक्ष असतील तर त्यांनी याआधी हे सर्व धंदे बंद कराव्यात. तसेच येथील येणाऱ्या काही पोलिसांना दोडामार्ग तालुका आर्थिक प्राप्तीचे कुरण बनले आहे. त्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे म्हापसेकर म्हणाले.
तालुक्यातील जनतेला या घटनेचा त्रास
आपल्या तालुक्यातील अनेक युवक युवती गोव्यात कामानिमित्त जात असतात. अशा प्रकारच्या घटनांमुळे येथील पोलिस व नागरिक त्रास देऊ शकतात. तसेच सध्या जे गोमांस वाहतूक सुरू आहे त्यामागे पोलिसांचा वरदहस्त असल्याचा संशय म्हापसेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यापुढे अशी वाहतूक होताना आढळून आल्यास याला जबाबदार पोलीस प्रशासनच असतील असेही म्हापसेकर म्हणाले.