दोडामार्ग : नरकासूराच्या रात्री दोडामार्ग बाजारपेठेत थंड पेय आणण्यासाठी आलेल्या युवकांना दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारल्याच्या कारणावरून बुधवारी शहरात चांगलेच वातावरण तापले. एवढ्यावरच न थांबता पोलीस ठाण्यात नेतअसताना पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा आरोप त्या युवकांनी केला. त्यापैकी एक युवक अत्यवस्थ झाला. त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला बांबोळी गोवा येथे नेण्यात आले. यावेळी संबंधित युवकांनी त्यांच्या पाठीवर मारहाणीचे उठलेले वळही दाखविले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना धारेवर धरले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले हे घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर वातावरण शांत झाले. मात्र पोलिस निरीक्षकांकडून घडलेल्या या प्रकाराबाबत तालुक्यातील जनतेमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान याबाबत ओतारी यांना विचारणा केली असता त्यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला. सदरचे युवक हे आपल्या गाडीचा मोठा आवाज करून हुल्लडबाजी करीत होते .त्यामुळे त्यांना आपण तेथून जाण्यास सांगितले. पण त्यांनी न जुमानता पोलिसांशी हुज्जत सुरूच ठेवली परिणामी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मी गरजेच्या वेळी आवश्यक पोलीस बळ राखण्याच्या अधिकारातून कानाखाली लगावली असे सांगून त्या युवकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी , बुधवारी नरकासुर असल्याने शहराला लागून असलेल्या साळ पुनर्वसन येथिल काही युवक बाजारपेठेत रात्रौ १०.३० वा च्या दरम्यान थंड पेय आणण्यासाठी आले होते. यावेळी ते रस्त्याच्या कडेला गाडी लावून उभे असताना आपल्या कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी त्याठिकाणी आले. व त्यांनी गाडीचा कर्णकर्कश आवाज काढून हुल्लडबाजी का करतात ? असे विचारून गाडीची चावी काढून घेतली. यावेळी त्या युवकांनी साहेब तुम्ही चावी का काढता ? आम्ही थंड पेय नेण्यासाठी आलोय आणि गाडीचा आवाज हा आरटीओ परवानगी असलेला कंपनी फिटेड सायलंसरचा आहे. आणि आम्ही कर्णकर्कश आवाज काढत नाही आहोत आता आम्ही निघणारच होतो तेवढ्यात तुम्ही आला असे सांगितले. मात्र श्री.ओतारी यांनी त्या युवकांचे न ऐकता त्याच्या थोबाडीत मारली. हा प्रकार त्या युवकांपैकीच एकजण आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होता. त्याचा राग आल्याने ओतारी यांनी मोबाईल काढून घेत पोलीस ठाण्यात नेले . येथे एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेले व पुढील उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयात सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांची धाव
बाजारपेठेत आलेल्या युवकांना पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केलेल्या मारहाणीत एकजण अत्यवस्थ झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच साळ पुनर्वसन मधील नागरिक, सर्वपक्षीय नेत्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. यावेळी भाजपचे जिल्हासरचिटनिस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शिंदेंसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण , स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आदी उपस्थित होते. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी निसर्ग ओतारी याना चांगलेच धारेवर धरले त्यामुळे वातावरण तंग बनले होते.
पोलीस निरीक्षकांकडून मारहाण झाल्याचा युवकांचा आरोप
दरम्यान त्या युवकांनी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पोलीस ठाण्यात नेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला शिवाय बेल्टनेही मारहाण केली त्याचे पाठीवर हातावर आणि मांड्यांवर उठलेले व्रणही दाखविले.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक दोडामार्गमध्ये दाखल
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक ऋषिकेश रावले रात्रीच दोडामार्गमध्ये दाखल झाले. त्यांच्याशी संतापलेल्या नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा केली. ओतारिंच्या कारभाराचा त्यांनी पाढाच वाचला त्यानंतर आपण योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान बाजारपेठेत उभ्या असलेल्या युवकाच्या थोबाडीत पोलीस निरीक्षकांकडून मारतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या प्रकाराबाबत तालुक्यातुन संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
पोलीस निरीक्षकांकडून मारहाणीचा इन्कार
याबाबत निसर्ग ओतारी यांना विचारणा केली असता त्यांनी मारहाणीच्या आरोपांचा इन्कार केला. तर त्या मुलांवरील पाठीवरचे व्रण कसले आहेत ते माहीत नाही. मी कोणालाही मारहाण केली नाही. कदाचित स्वतःवर कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी स्वतःच हे कृत्य केले व चुकीचे आरोप केले असावेत असे सांगितले. तसेच संचित गवस ( वय -२२), ऋतुराज नाईक ( २३) , आदेश नाईक ( वय -२२ ) ऋतिक गवस ( २३ ) या चौघांवरही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.