जिल्हा निवडणूक अधिकारी यांची मिडिया कक्षाला भेट

Edited by: संदीप देसाई
Published on: October 31, 2024 19:50 PM
views 53  views

सिंधुदुर्गनगरी : आचारसंहिता काळात माध्य कक्षाचे आणि विशेषत: माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कार्य महत्वाचे आहे. या समितीद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रमाणिकरण करणे, जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे एमसीएमसीची मुख्य जबाबदारी असून याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाने स्थापन केलेल्या मिडिया कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्षाला ( एमसीएमसी ) त्यांनी आज भेट दिली.

श्री पाटील म्हणाले, उमेदवार मुद्रित माध्यमांसह दृकश्राव्य माध्यम, समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणात जाहिरात करत असतात. या माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट, पेड न्यूज आहेत का यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे निवडणूक आचारसंहिता कालावधीत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच समाज माध्यमांमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तात्काळ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे असेही ते म्हणाले.

 एमसीएमसीचे सदस्य सचिव तथा माध्यम कक्षाचे प्रमुख जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी एमसीएमसी समिती आणि मिडिया कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांना दिली. या समिती मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रमाणित केले जाते. याशिवाय वृत्तपत्रात, विविध वाहिन्यांवर तसेच सोशल माध्यमांवर उमटणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट बघून यामध्ये पेड न्यूजच्या प्रकारात माहिती दिली तर जात नाही याचे निरीक्षण केले जात असल्याचेही श्री चिलवंत यांनी सांगितले.