‘परफेक्‍ट मार्केर्टिंग’ हाच पर्यटन विकासाचा प्रमुख स्‍त्रोत

Edited by: स्वप्नील परब
Published on: September 26, 2024 14:32 PM
views 242  views

पर्यटनाचा विषय आला की, गोवा, केरळ, राजस्‍थान ही राज्‍ये डोळ्यासमोर येतात. याचे कारण ‘पर्यटन’ हा केंद्रबिंदू ठेवून या राज्‍यांनी मेहनतीने ‘टूरिझम’क्षेत्रात क्रांती केली. गोवा विस्‍तीर्ण समुद्रकिनारे आणि खाद्यसंस्‍कृतीसाठी प्रसिद्ध, केरळ निसर्ग आणि आयुर्वेदिक उपचार तर राजस्‍थान वाळवंट आणि हस्‍तकलेने जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. तद्वत कोकणची खाद्य, सांस्‍कृतिक, धार्मिक संस्‍कृतीची परंपरा देश-विदेशातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कोकणातील विस्‍तीर्ण रमणीय समुद्रकिनारे, गडकिल्ले, वेगवेगळ्या परंपरा दर्शविणारी मंदिरे, आदरातिथ्‍य या सर्वांचा खजिना ओतप्रोत भरून असलेल्‍या कोकणात हळूहळू पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातात, तिथे तिथे आपल्याला ‘प्लॅन्ड टूरिझम दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला ‘थीम्स’ भेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित ‘थीम्‍स बेस्ड’ काम व्हायला हवे आहे. अर्थात ‘परफेक्‍ट मार्केर्टिंग’ हाच पर्यटन विकासाचा प्रमुख स्‍त्रोत आहे. कोकणच्‍या पर्यटन विकासासाठी वर्षभरात राज्‍य शासनाकडून दीड हजार कोटींपेक्षा जास्‍त निधीची तरतूद करण्‍यात आली आहे. पर्यटनस्‍थळांचा विकास होत आहे. आज जागतिक पर्यटन दिन! यावर्षीची थीम कोकणच्‍या संस्‍कृतीला साजेशी आहे, आणि ती म्‍हणजे,  "पर्यटन आणि शांतता"

सिंधुदुर्गात पर्यटनाभिमुख प्रकल्‍प 

सध्‍याचे पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे या सर्व नेत्‍यांची मदार एकच ‘कोकण विकास’ आणि त्‍या विकासाचा केंद्रबिंदू आहे, ‘पर्यटन’. कारण पर्यटनच कोकणाला तारू शकते. त्‍यामुळेच पायाभूत सुविधांवर सध्‍या भर दिला जात आहे. मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्ग युद्धपातळीवर सुरू आहे. चिपी विमानतळ, रेल्‍वे स्‍थानकांचे सुशोभिकरण या गोष्‍टींतून पर्यटकांचे लक्ष आकृष्‍ट करण्‍याकडे कल आहे. शिवाय मालवण, वेंगुर्ला, निवती येथेही स्‍कुबा डायव्‍हिंग, पाणबुडी यासारख्‍या प्रकल्‍पांसाठी भरीव निधीची तरतूद करण्‍यात आली आहे. आपल्‍या जिल्‍ह्यासाठी अभिमानास्‍पद बाब म्‍हणजे, विजयदुर्गचा किल्ला जागतिक स्‍तरावर झळकणार आहे. युनस्‍कोची टीम लवकरच येथे दाखल होईल. त्‍यानंतर आपोआप येथील कला, संस्‍कृती विदेशात पोहोचेल. त्‍याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी नक्कीच होईल. विशेष म्‍हणजे शिवछत्रपतींच्‍या पावन स्‍पर्शाने पुलकीत  झालेला आपला जिल्‍हा गडकिल्ल्यांच्‍या माध्‍यमातूनही जगासमोर येत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण यांचे विशेष आभार, की त्‍यांच्‍याच संकल्‍पनेतून ११ गडकिल्ल्यांचा विकास होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाने गड किल्ले विकासासाठी अर्थसंकल्पात ११ गड विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करू दिला.

 क्रूझ टर्मिनल ठरतील ‘टर्निंग पॉइंट’

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकासाच्या द़ृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी परदेशी जहाजांसाठी कोकणात चार ठिकाणी क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये रत्नागिरीचाही समावेश आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे मेरिटाईम मंडळाने या संबंधीचा प्रस्ताव आंतरराज्य जलवाहतूक मंत्रालयाकाडे सादर केला होता. त्याला प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. निसर्ग संपन्न कोकणात दरवर्षी हजारो देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, त्यात देशी पर्यटकांचीच संख्या जास्त असते. जास्तीत-जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कोकणकडे आकृष्ट करणे हा क्रूझ टर्मिनल मागील हेतू आहेच. गोव्याप्रमाणे पर्यटनाच्या द़ृष्टीने कोकणचे महत्त्वही तेवढेच वाढले पाहिजे, यावर मेरिटाईम बोडाने भर देताना या प्रस्तावाची मांडणी केली आहे. कोकणचा निसर्ग, विशाल सागर किनारे, कोकणातील दैनंदिन जीवन, नारळी-पोफळीच्या आंबा-काजूच्या बागा असा अनोखा नजारा पर्यटकांना पाहता यावा, असा मेरिटाइम बोर्डाचा उद्देश आहे. त्या नुसार या प्रस्तावचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आता मेरिटाइम बोर्डाच्या प्रस्तावांची केंद्रीय मंत्रालयाकडून छाननी केली जाणार आहे.

निवास, न्‍याहारीतून रोजगारनिर्मिती शक्‍य 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण आणि देवगड हे तीन तालुके समुद्र किनाऱ्यालगत, तर दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी हे पाच तालुके सह्याद्री पट्टय़ात आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य, औषधी वनस्पती, बॅक वॉटर, आंबोली थंड हवेचे ठिकाण, रेडी, शिरोडा, वेंगुर्ले, उभादांडा, वेळागर, भोगवे, मालवण, तारकर्ली, देवबाग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला इत्यादी अनेक ठिकाणी पर्यटनाला वाव आहे. दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर म्हणून आंबोली थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटकांची संख्‍या वाढल्‍यानंतर निवास, न्‍याहारीतून रोजगारनिर्मिती शक्‍य आहे. 

तरुणांना साहसी पर्यटन आवडेल  

कोकणात प्राचीन, अतिप्राचीन मंदिरे जागोजागी आढळतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्‍ही जिल्ह्यांमध्ये राज्यभर प्रसिद्ध असणारी मंदिरे आहेत आणि दरवर्षी लाखो लोक त्या ठिकाणी भेट देतात; पण त्यात निवासी पर्यटकांची संख्या अल्प आहे. ज्यावेळी ती वाढेल, तेव्हाच स्थानिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटन विकास म्हणता येईल. समुद्रकिनारी वसलेल्या काेकणाला खाड्यांचे मोठे वरदान आहे. खाडीमधील बोटिंग, खाडी आणि परिसरातील जैवविविधता, पक्षीदर्शन हे सर्व खूप आकर्षक आहे. गडकिल्ले, डोंगरदऱ्यांमुळे साहसी पर्यटनाला मोठी संधी आहे. आजच्या तरुणाईला साहसी पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणातील डोंगरदऱ्या त्यांच्या पसंतीस उतरू शकतात; कोकणात कातळशिल्पे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. गोव्याच्या धर्तीवर कोकणातील किनारपट्टीवर शॅक्स उभारण्याची योजना प्रभावीपणे राबविण्‍याची गरज आहे.

खाद्यसंस्‍कृतीच्‍या प्रेमात पडतील पर्यटक...

पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी? आणि कसे? यासाठी प्रयत्न व्हायला हवे असून पर्यटन म्हणून कामाची इथे संधी आहे. कोकणभूमीत आनंदप्राप्तीसाठी येणार्‍या पर्यटकांना जेवणही कोकणातील रीतिरिवाजानुसार मिळायला हवं आहे. किमान तसे पर्याय हॉटेलच्या ‘मेनू कार्ड’वर उपलब्ध असायला हवेत. यासाठी कोकणातील कॅटरिंग, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काम करणार्‍या महाविद्यालयांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांना कोकणातील हॉटेल व्यवस्थापनाकडून रोजगार संधी मिळायला हव्यात. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील विविध समाजांची जेवण बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वापरल्या जाणार्‍या मसाल्यांची लज्जत न्यारी आहे. ती पर्यटकांपर्यंत पोहोचायला हवी. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये आजही कोकण दिसत नाही. अपवादात्मक काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागलंय. यातल्या तारकर्लीला २०११ साली आदरातिथ्यात देशात पहिला क्रमांक मिळाला होता. २०१५ साली तारकर्लीचा देशातील सर्वोत्कृष्ट सागरी किनारा म्हणून सन्मान झाला होता. 

कोकण बनेल ‘चित्रपंढरी’

कोकणाचे सौंदर्य  टिपण्‍यासाठी अनेक चित्रपट निर्माते येथे येऊ लागलेत. या सार्‍यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदुर्गची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉइंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अ‍ॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंट्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरू झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं प्रभावी मार्केटिंग झालं तर कोकणात परदेशी पर्यटक टक्का वाढेल. तो इथल्या रोजगारनिर्मितीस पूरक ठरेल.

कोकणातलं कौलारू घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाच्या, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळुझुळु वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट देशभरातील पर्यटकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला हवा आहे. यासाठी ‘कोकण’ देशभर पोहोचवू शकेल अशा ‘प्रभावी मार्केटिंग’ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे, कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. त्यासाठी कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. त्‍यानंतर पर्यटनाचे नवे हब पाहावयास मिळेल. 

‘डिजिटल मार्केटिंग’ घडविणार क्रांती 

येत्या काही वर्षांत साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नांतून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, कातळ खोदचित्रे, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाइल्ड लाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाइल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटर पार्क, थीम पार्क आणि सर्वात महत्त्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राइडसारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रिय करून पर्यटन समृद्धी आणणे शक्य आहे. दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरण प्रकल्‍प परिसर सुद्धा पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. आणि त्‍यासाठी आमदार, मंत्री यांचे प्रामाणिक प्रयत्‍न व्‍हायला हवेत.


स्‍वप्‍निल परब

उपसंपादक, दै. कोकणसाद