कुडाळ : भडगाव इथं पत्नीचा खून करून पळालेल्या ओमप्रकाश बंधन सिंह याला कुडाळ पोलिसांनी झारखंड येथून ताब्यात घेऊन अटक केली असून कुडाळ न्यायालयात हजर केले असता ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
सेंट्रींगचे काम करणारा ओमप्रकाश सिंह याने त्याची पत्नी रेणुका उर्फ रेश्मा सिंह तिच्यावर संशय घेऊन तिचा खून केला होता. ही घटना १३ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबरच्या मुदतीत घडली होती. खून केल्यानंतर ओमप्रकाश सिंह यांनी मुलगी रिया सिंह हिला या घटनेबाबत माहिती दिली होती आणि ओमप्रकाश सिंह हा फरारी झाला होता.
पत्नीचा खून करून फरारी झालेल्या ओमप्रकाश सिंह याला शोधण्यासाठी कुडाळ पोलिसांनी मुंबई, झारखंड येथे पथक पाठवले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. मुंबई येथे गेल्यावर त्याने आपल्या मोबाईल मधील सिम कार्ड बदलले होते. त्यामुळे सायबर क्राईम पथकाला ओमप्रकाश सिंह याचे ठिकाण मुंबई पर्यंत मिळत होते. दरम्यान त्याच्या मोबाईलचा आयईएम नंबर वरून त्याचा शोध लागला. त्याने या मोबाईल मध्ये दुसरे सीम बदलले होते. थोडे दिवस त्याचे पोलिसांना ठिकाण मिळत असताना अधून मधून तो मोबाईल बंद करत होता.
काही दिवसापूर्वी त्याचे ठिकाण एका जागी आढळून आले. कुडाळ पोलिसांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांना झारखंड येथे तपास कामासाठी पाठवले. त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने झारखंड येथे ग्रामीण भागामध्ये ओमप्रकाश सिंह असल्याचे अजून आले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सापडली डायरी
ओमप्रकाश सिंह यांच्याजवळ त्याच्या हस्ताक्षरातील डायरी आढळून आले या डायरीमध्ये आपल्या पत्नीने कसा धोका दिला हे नमूद होते तसेच तो आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचेही नमूद केले आहे ही डायरी कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतली अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपाधीक्षक विनोद कांबळे यांचे सहकार्य लाभले तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश क-हाडकर, पोलीस उपनिरीक्षक शेगडे, पोलीस हवालदार प्रितम कदम, सायबर पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्यामुळे हा आरोपी हाती मिळाला असे त्यांनी सांगितले.