LIVE UPDATES

केंद्राच्या 'स्वदेश दर्शन' योजनेतून सावंतवाडी मतदार संघातून १०६ कोटींचे प्रस्ताव सादर

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती : मतदार संघातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 21, 2026 21:06 PM
views 48  views

सावंतवाडी : इंग्लंड व सिंगापूरमध्ये जैवविविधता संवर्धनाचे प्रकल्प अभ्यासायला जगभरातून पर्यटक येतात. आपल्या आंबोली चौकुळ गेळे भागात अशाच प्रकारची जैवविविधता आहे. त्यामुळे तसे प्रकल्प या भागात आल्यास शाश्वत पर्यटन होईल यासाठी केंद्राच्या 'स्वदेश दर्शन' पर्यटन प्रकल्पात १०६ कोटी रुपयांचे प्रस्ताव घेऊन अलीकडेच दिल्लीला गेलो होतो. तिथे माझी सकारात्मक चर्चा झाली. हे प्रकल्प मार्गी लागल्यास पर्यटन व रोजगाराच्यादृष्टीने मोठा फायदा या जिल्ह्याला होईल, असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख बबन राणे आणि जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, नगरसेवक अजय गोंदावळे, राकेश पवार आदी उपस्थित होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानावर सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. त्याची वास्तू सद्यस्थितीत पूर्ण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर येत्या तीन ते चार महिन्यात त्याचे उद्घाटन होऊन प्रत्यक्ष सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र सुरू होईल व या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा वाद मिटल्यामुळे लवकरच या ठिकाणी ८८ कोटींचे ७ मजली रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. त्याचबरोबर वेंगुर्ले व दोडामार्ग येथील डॉक्टर रुग्णालयांच्या इमारती देखील पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर व इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण लवकरच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या रुग्णालयाच्या जागेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, एकूण ९० गुंठे जागा शासनाकडे राहील, तर ५० गुंठे जागा राजघराण्याला दिली जाईल. कोणत्याही शासकीय रुग्णालयाला वैयक्तिक नाव दिले जात नसून ते शासकीय रुग्णालय म्हणूनच ओळखले जाते, मात्र राजघराण्याने या प्रकल्पासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मला शिवरामराजे यांनीच राजकारणात आणले असून, या अत्याधुनिक रुग्णालयाची निर्मिती हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी न्यायालयात दाद मागणाऱ्या संस्थांचेही आभार मानत, त्यांना अपेक्षित असलेली दर्जेदार आरोग्य सेवा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

यासोबतच वेंगुर्ले आणि दोडामार्ग येथेही लवकरच सुधारित आरोग्य सुविधा दिल्या जाणार असून, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष व आरोग्य सभापती यांच्या माध्यमातून ही सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल. आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर वन नोंदी आहेत, त्यांचे वाटप करणे तसेच सामायिक सातबारा व प्रत्यक्ष वहिवाट असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.

शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या महामार्गाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या महामार्गाची अलाइनमेंट बदलण्याचे प्रयत्न सुरू असून, मळगावला हा महामार्ग जोडण्यासाठी आणि चौकुळ येथे आऊटलेट देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पावसाळ्यानंतर याचे सर्वेक्षण सुरू होणार असून, बाधित लोकांना मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळणार आहे. याशिवाय, पुढील चार ते पाच दिवसांत पाच नवीन एसटी बसेस दाखल होणार असून, त्यांचे लवकरच लोकार्पण केले जाईल. तसेच सुरक्षा रक्षकांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण येत्या दोन महिन्यांत सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाला प्राधान्य देणारे नेते असून, त्यांनी ताज हॉटेल समूहाशी सामंजस्य करार घडवून आणला आहे, ज्याचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले.