LIVE UPDATES

रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला व्हीलचेअर प्रदान

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 20:21 PM
views 28  views

सावंतवाडी : रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या सावंतवाडी येथील 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या कार्याची दखल घेत 'रोटरी क्लब सावंतवाडी'च्यावतीने संस्थेला एक नवी कोरी व्हीलचेअर प्रदान करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हीलचेअर स्वीकारण्यात आली असून, ती गरजू व गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जाणार आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था रुग्णांना २४ तास तात्काळ सेवा देत असते. विशेष म्हणजे, गोरगरीब रुग्णांना लागणाऱ्या विविध रुग्णोपयोगी वस्तू 'वापरून परत करा' या तत्त्वावर या संस्थेच्या माध्यमातून मोफत दिल्या जातात. संस्थेच्या या अविरत आणि पारदर्शक कार्याची दखल घेऊन शहरातील अनेक दानशूर व्यक्ती आपल्याकडील रुग्णोपयोगी वस्तू या संस्थेला मदत म्हणून दान करत असतात.  रोटरी क्लबकडून मिळालेली ही व्हीलचेअर रुग्णांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जाईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. याच धर्तीवर प्रतिष्ठानने समाजातील इतर संस्था व दानशूर व्यक्तींना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे:

रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी उपक्रमाची विशेष दखल घेत ही मदत सुपूर्द केली. रोटरी क्लब नेहमीच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्या संदर्भात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवत असतो. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रोटरी क्लबचे आभार मानण्यात आले. या उपक्रमाचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

व्हीलचेअर सुपूर्द करताना रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष व नगरसेवक अॅड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव सिताराम तेली, अनंत उजगावकर, आनंद रासम, प्रवीण परब, दयानंद गवस, कवी सुधीर धुमे, जितू पंडित, अभय पै आणि कवी दीपक पटेकर उपस्थित होते. तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने ही व्हीलचेअर स्वीकारताना रवी जाधव व लक्ष्मण कदम उपस्थित होते.