LIVE UPDATES

देवगड आगारात पाच नव्या 'जिजाऊ' बसचे लोकार्पण

नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 20:58 PM
views 41  views

देवगड : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या 'जिजाऊ' बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून बसांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रीफळ अर्पण करण्याचा मान सभापती गणेश राणे यांना मिळाला.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, विभाग नियंत्रक दीपक घोडे, संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, वैभव कळंगुटकर, योगेश पाटकर, दया पाटील, सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, नगरसेवक, विषय समिती सभापती, देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, यंत्र अभियंता, चालक पांडुरंग वाघमोडे, स्थानक प्रमुख डोंगरे, साई ओटवकर, घाडी, जाधव, पवार तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पणानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी नव्या जिजाऊ बसांची पाहणी केली. या बसेस अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपस्थित एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रवाशांना दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. देवगड आगारात दाखल झालेल्या या पाच नव्या जिजाऊ बसांमुळे तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.