
मालवण : शहरातील अनेक मूलभूत नागरी समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असताना नवीन विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आप्पा चव्हाण यांनी केला आहे. प्रथम अपूर्ण योजना पूर्ण करून जनतेच्या सेवेत आणाव्यात, अन्यथा सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, मालवण नगरपरिषदेच्या अनेक इमारती व विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र त्यातून नगरपरिषदेला अपेक्षित उत्पन्न मिळत नसून अनेक सुविधा आजही बंद किंवा अपूर्ण अवस्थेत आहेत. मच्छीमार्केट इमारतीतील गळती, मोडकळीस आलेला पहिला मजला, भाजी मार्केटची अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेली इमारत, मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरावस्था, भुयारी गटार योजनेचे अपूर्ण काम, अग्निशमन बंबाची वारंवार नादुरुस्त अवस्था, रॉक गार्डनमधील म्युझिकल फाउंटन व प्रकाशयंत्रणेतील त्रुटी याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वाढता उपद्रव, डास निर्मूलन व विहिरींच्या पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना बंद पडणे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, उघड्यावर कचरा जाळल्याने होणारे प्रदूषण, पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या तसेच स्थानिक व्यावसायिकांच्या हिताचे संरक्षण करण्याची गरज यासारखे प्रश्नही श्री चव्हाण यांनी उपस्थित केले आहे.
नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील या मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी वायरी येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याच्या नावाखाली ग्रीन झोनमधील स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आरक्षित करण्याचा घाट घातला जातं आहे. संबंधित जमीनमालकांची संमती नसताना सक्तीने जमीन हस्तांतरित करण्याची भाषा वापरली जात असून हा प्रकार अन्यायकारक आहे. प्रथम अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत आणावेत आणि त्यातून नगरपरिषदेला उत्पन्न मिळेल, याकडे लक्ष द्यावे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा. अन्यथा सर्वपक्षीय, सामाजिक संघटना आणि नागरिकांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा आप्पा चव्हाण यांनी निवेदनातून दिला आहे













