
कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे येथे महामार्गालगत मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू आहे. ही माती ओसरगाव येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी नेत असल्याचे समजते आहे . तसेच मातीने भरलेले मोठे डंपर महामार्गावर विरुद्ध दिशेने येतात. त्यामुळे अपघात देखील होण्याची भीती आहे. त्यामुळे शेकडो ब्रास माती उत्खननाची परवानगी अथवा नोंद दाखवून प्रत्यक्षात हजारो ब्रास मातीचे उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
महामार्गालगत सुरू असलेल्या बांधकामासाठी परिसरातील माती काढून तिचा वापर करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत आहेच , तसेच उत्खननासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शेकडो ब्रास मातीच्या नावाखाली प्रत्यक्षात हजारो ब्रास मातीचे उत्खनन झाले असल्यास महसूल विभाग याची मोजणी व प्रत्यक्ष पाहणी करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची महसूल विभागाने तातडीने पाहणी करून उत्खननाचे प्रमाण, परवानगी आणि शासनाला भरलेला महसूल याची तपासणी करणार असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.










