
सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी तसेच देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा भाजपा व महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्यातर्फे हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दि. ११ ऑगस्ट २०२६ सकाळी १० वाजता, श्री जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली असून सावंतवाडी तालुक्यातील सर्व हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली असून प्रथम ७,००० रुपये, द्वितीय ५,००० रुपये, तृतीय ४,००० रुपये, चतुर्थ ३,००० रुपये आणि पाचवा २,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रत्येक संघात किमान ६ व कमाल १५ विद्यार्थी असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी व संस्कारक्षम समूहगीत सादर करणे अपेक्षित असून मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेतील गीतांना मान्यता असेल. चित्रपट गीतांना प्राधान्य दिले जाणार नाही. प्रत्येक संघासाठी सादरीकरणाची कमाल वेळ ७ मिनिटे असेल. समूहगीतासाठी संगीत साथ करणारे वादक संबंधित हायस्कूलमधील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यक वादक उपलब्ध नसल्यास सावंतवाडी तालुक्यातील इतर कोणत्याही हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना संगीत साथ करण्याची परवानगी असेल. हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ आदी मर्यादित वाद्यांना परवानगी देण्यात आली असून, रेकॉर्डेड ट्रॅक, ऑर्केस्ट्रा अथवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संगीताचा वापर करण्यास सक्त मनाई राहील.
स्पर्धेतील सादरीकरणाचे मूल्यमापन सूर, ताल, शब्दांची स्पष्टता, अभिव्यक्ती, समन्वय, शिस्त आणि एकूण सादरीकरण या निकषांवर करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. स्पर्धेसाठी दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून, इच्छुक शाळांनी विहित मुदतीत आपली नावे सावंतवाडी भाजपा कार्यालयात दशरथ मांजरेकर 7875525496 व विनेश तावडे 7744057989 यांचेकडे नोंदवावीत, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सर्व हायस्कूलनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या कंठातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.










