LIVE UPDATES

एनसीएमसी कार्डच्या प्रणालीमधील तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी त्रस्त

'सक्षम स्त्री फाउंडेशन'चे सावंतवाडी स्थानक प्रमुखांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 18:40 PM
views 72  views

सावंतवाडी : नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांना होणाऱ्या नाहक आर्थिक भुर्दंडाबाबत आणि तक्रारीबाबत सक्षम स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका नीलम नाईक यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी बसस्थानकात त्यांनी स्थानक प्रमुखांना याबाबतच निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करण्यासाठी NCMC चा वापर करत आहेत. शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत या कार्डाला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या कार्डाच्या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांकडे वैध NCMC कार्ड आणि त्यात पैसे असताना देखील बसमधील मशीनमध्ये 'एरर' दाखवला जातो. परिणामी, कार्ड स्कॅन न झाल्याचे कारण सांगून प्रवाशांकडून रोख स्वरूपात पूर्ण  तिकीट वसूल केले जात आहे.

प्रवाशांचे NCMC कार्ड ऑनलाईन किंवा अधिकृत केंद्रांवरून रिचार्ज करताना वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत, मशीन वर रिचार्ज होऊन व पैसे घेऊन देखील कार्ड ला पैसे येत नसल्याचे प्रकार होत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरीनिमित्त प्रवास करणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे रोख पैसे नसतात किंवा ऐन वेळी त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे प्रवाशांसोबत वाहकांची अनावश्यक बाचाबाची होत आहे.

तरी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, NCMC कार्ड प्रणालीतील तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यात यावा. तसेच, जोपर्यंत ही यंत्रणा सुरळीत चालत नाही, जोपर्यंत एसटी बसमधील सर्व मशिन्स आणि नेटवर्क यंत्रणा सुरळीत चालत नाहीत तोपर्यंत एनसीएमसी कार्डची सक्ती थांबवावी आणि तांत्रिक बिघाड तातडीने दूर करावा व कार्ड असल्यास महिलांना हाफ तिकीट च देण्यात यावे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थीनी, महिलांना या अडचणींमुळे होणाऱ्या आर्थिक भुर्दंडापासून दिलासा द्यावा, या समस्येवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या.