LIVE UPDATES

कुपोषणमुक्त देवगडसाठी पालकांनी मुलांना सकस आहार द्यावा

नवचेतना आधारशिला बाल मेळाव्यात उपसभापती अमोल लोके यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 17:50 PM
views 20  views

देवगड : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा नवचेतना आधारशिला बाल मेळावा उपक्रम गावागावातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविला जात आहे. बालवयातच मुलांना सकस व सात्विक आहार दिल्यास त्यांची शारीरिक वाढ व आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालकांनीही पालन करून तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी केले.

कुणकेश्वर-चांदेलवाडी येथील अंगणवाडी केंद्रात आयोजित नवचेतना आधारशिला बाल मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच महेश ताम्हणकर, उपसरपंच शशिकांत लब्दे, डॉ. कोमल मांडवकर, सावित्री घाडी, विष्णू पेडणेकर, दिलीप घाडी, बाबाजी पेडणेकर, अमित घाडी, अंगणवाडी सेविका शुभांगी तेली, शरयू हिर्लेकर, स्नेहल लाड, आशा सेविका रिद्धी बाईत, श्रुतिका कदम, भूमी देऊलकर आदी उपस्थित होते.

कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांनी बाहेरील खाद्यपदार्थांऐवजी मुलांना घरगुती पदार्थ, फळे व पौष्टिक आहार देण्याचे आवाहन केले. गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमात ग्रामपंचायत सहभागी असून आरोग्य सेविका व आशा सेविकांना पालकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कोमल मांडवकर यांनी पोषण आहार कार्यक्रमाचा कालावधी वाढवून महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मुलांच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करावा, तुपाचा योग्य वापर करावा आणि पॅकेज्ड व बाहेरील खाद्यपदार्थ देणे टाळावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविका, माता-पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ मतदार महिलेचा उपसभापतींनी केला सन्मान

कुणकेश्वर-चांदेलवाडी येथील नवचेतना आधारशिला बाल मेळाव्याचे उद्घाटन गावातील सावित्री घाडी या ७६ वर्षीय ज्येष्ठ वयोवृद्ध महिलेच्या हस्ते करण्यात आले. आज मी लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मतदारांमुळे निवडून आलो, उपसभापती झालो. त्यामुळे मतदारांचा यथोचित सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी उपसभापती अमोल लोके यांनी सांगितले.