LIVE UPDATES

कापसापासून साकारलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन, विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 12:18 PM
views 54  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि व्यावहारिक कौशल्यांना वाव देण्यासाठी शेठ.म.ग. हायस्कूल, देवगड येथे कापसापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रदर्शन व विक्री उपक्रम गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात आयोजित करण्यात आले.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी  कापसाचा नावीन्यपूर्ण आणि कल्पकतेने वापर करून गणपतीसाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची आकर्षक वस्त्रे तयार केली होती. यासोबतच गणपतीसाठी कापसापासून तयार केलेले हार, विविध प्रकारच्या फुलवाती, हातातील वस्त्र, कमरेचे पट्टे तूप वाती ,मूषकासाठी हार तसेच अन्य सजावटीच्या वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार करून प्रदर्शनात मांडल्या होत्या.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक साहित्याचा सर्जनशील वापर करून तयार केलेल्या या वस्तूंना पालक तसेच उपस्थित मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव मिळाला. वस्तू तयार करण्याबरोबरच त्यांचे सादरीकरण, विक्री, ग्राहकांशी संवाद आणि व्यवहार यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला.

या उपक्रमाला लोकल कौन्सिलचे सचिव अविनाश माणगावकर शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, लोकल कौन्सिल सदस्य अनुश्री पारकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, माजी विद्यार्थी संघ सदस्या विद्या माणगावकर तसेच अनेक पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कल्पकता, सर्जनशीलता, उद्योजकता, संघभावना, आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान आणि आत्मविश्वास या विविध गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमातून घडून आला.

या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन शाळेतील शिक्षिका आफरीन पठाण,  रश्मी ठाकूर आणि अमृता किरकिरे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे शिक्षण देणारा हा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल संस्था पदाधिकारी, पालक, शिक्षक व उपस्थित मान्यवरांकडून शाळेचे कौतुक करण्यात आले.