LIVE UPDATES

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देवगडात प्रशासन सज्ज

नगराध्यक्ष , मुख्याधिकारी , पोलीस निरीक्षक फिल्डवर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 13:14 PM
views 37  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना देवगडचा शुक्रवारचा आठवडी बाजार भरल्याने बाजारपेठेत नागरिकांसह मुंबई, पुणे व अन्य शहरांतून आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले.

शुक्रवारी सकाळपासूनच नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने आणि पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी आठवडी बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीचे नियोजन केले. वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही, तसेच पार्किंगची व्यवस्था याचीही पाहणी करण्यात आली. प्रशासनाच्या या नियोजनामुळे नेहमीच्या तुलनेत आठवडी बाजार परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात टाळण्यात यश आले.

आठवडी बाजाराच्या नियोजनासाठी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, स्वप्निल बुचडे, कुंदन घाडी, अर्चना गायकवाड, लक्ष्मण लोंढे तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. तर पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस प्रवीण सावंत, आशिष कदम, प्रतीक जाधव, प्राची सावंत, नितीन डोईफोडे, योगेश महाले यांच्यासह पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी तैनात होते.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच आठवडी बाजार आल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. मात्र, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त नियोजनामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले.

पोलीस निरीक्षक शाम बुवा तसेच वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी वाहनांच्या पार्किंग व वाहतुकीबाबत कठोर भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही केली. विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. शहरातील वळणाच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात आले असून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सक्त सूचना देण्यात येत आहेत. गणेशोत्सव काळात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.