
कणकवली : गणेशोत्सव कालावधीत चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे गाड्यांची घोषणा झाली खरी. मात्र, आरक्षण प्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही कालावधीतच या गाड्या फुल्ल झाल्यात. परिणामी चाकरमान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, कोकण रेल्वेने दिलास देणारी खुशखबर दिली आहे. आतापर्यंत २६० जादा फेर्यांची घोषणा झाली असली तरी यावर्षी किमान ४०० फेर्या सोडण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे. साहजिकच गणेश भक्तांसाठी यावर्षीही कोकण रेल्वे धावून येत आहे.
गणेशोत्सव आणि कोकणावासीय हे एक अतुट नाते आहे. हेच लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारल्यापासून ते आतापर्यंत रेल्वे प्रशासनाने प्रत्येक वर्षी गणेशभक्त चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे गाड्या सोडल्या. अर्थात त्याचा लाभ लाखो चाकरमानी दरवर्षी घेत असतात. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून चाकरमान्यांनाही आपले गाव गाठणे सोयीस्कर ठरू लागले. गतवर्षी गणेशभक्त चाकरमान्यांसाठी ३७० फेर्या सोडण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या गाड्यांना कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबा असल्याने चाकरमान्यांचा आणखीनच फायदा होतो. एकतर चाकरमानी बांधव हा गणेशोत्सवाची आवर्जून वाट बघत असतो. कारण, याच निमित्ताने त्याला गावी येण्याची संधी मिळते आणि वर्षभर बंदावस्थेतील घरांमध्ये किलबिलाट सुरु होतो. अर्थात चाकरमान्यांना ही संधी देण्यामध्ये कोकण रेल्वेचा मोलाचा वाटा आहे, हे मान्य करायलाच हवे.
१३ गाड्यांच्या २६० फेर्यांची घोषणा
कोकण रेल्वेतर्फे २७ जूलैला जादा रेल्वे गाड्यांची घोषणा झाली. या गाड्यांच्या तब्बल २६० फेर्या आहेत. ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत या गाड्या धावणार आहेत. सध्या घोषणा केलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी (दररोज) दोन स्वतंत्र गाड्या, एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी (साप्ताहीक) दोन स्वतंत्र गाड्या, सीएसएमटी – रत्नागिरी – सीएसएमटी (दररोज), दिवा – खेड – दिवा एमईएनयू (दररोज), एलटीटी – मडगांव – एलटीटी (साप्ताहीक) दोन स्वतंत्र गाड्याय, एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी (आठवड्यातून पाच दिवस), एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी (दररोज), पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहीक( दोन स्वतंत्र गाड्या, दिवा – चिपळूण – दिवा एमईएमयू स्पेशल अशा गाड्यांचा समावेश आहे.
अन् आरक्षणे फुल्ल
या जादा गाड्यांसाठी तिकीट खिडकीसह, आयआरसीटीसी ॲपच्या माध्यमातून तिकीटे काढता येतात. मात्र, आरक्षण प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अवघ्या काही काळातच बहुतांश गाड्या फुल्ल झाल्या. परिणामी जादा गाड्यांचे खरे लाभार्थी कोण, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
कोकण रेल्वेची खुशखबर
मात्र, कोकण रेल्वेने आणखी १४० गाड्या सोडणार असल्याचे दै. 'कोकण साद'शी बोलताना सांगितले आहे. गतवर्षी ३७० फेर्या सोडण्यात आल्या होत्या. यावेळी हा आकडा ४०० पार जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. साहजिकच चाकरमान्यांना प्रवास करणे आणखीन सुकर होणार आहे.
आणखी एक नियमीत गाडी धावणार?
केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी अशा गाडीला मंजूरी दिली आहे. ही गाडी नेमकी कधी धावणार, हे अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी ही गाडी गणेशोत्सवातच सुरु होईल व गणोशत्सवानंतरही ही गाडी नियमीत धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे. ही गाडी तुतारी एक्सप्रेसच्या नंतर सुटेल, अशीही माहिती मिळाली आहे. साहजिकच प्रवाशांसाठी ही आणखीन एक पर्वणी असणार आहे.
'डबल ट्रॅक' काळाची गरज
कोकण रेल्वे ट्रॅकवर दिवसाला ७० ते ७५ गाड्या धावत असतात. यात एक्सप्रेससह मालगाड्यांचाही समावेश आहे. त्यातच गणेशोत्सवात दिवसाला सरासरी २० ते २५ जादा गाड्या धावणार आहेत. एकीकडे कोकण रेल्वेचा मार्ग 'सिंगल' आहे. परिणामी एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या धावत असल्याने 'ट्रॅक बिझी'ची समस्या उद्भवते. याच कारणामुळे कोकण रेल्वेला जादा गाड्या सोडण्यास अडचणी येतात. सुरेश प्रभू केंद्रीय मंत्री होते, त्यावेळी त्यांनी 'डबल ट्रॅक'ची घोषणा केली होती. मात्र, सुरेश प्रभूंनी ते बोलत मंत्रिपद सोडले अन् कोकण रेल्वेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा, उपेक्षा आली, हे देखील मान्य करायला हवे. याचा परिणाम म्हणजे एकेरी मार्गावर एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या सोडणे हे एक आव्हान बनून जाते. म्हणूनच कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होण्यासाठी खासकरून राजकीय मंडळींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.











