
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस परिसरातील महामार्गाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओरोस खर्येवाडी येथील मुंबई ते गोवा मार्गिकेवरील बॉक्सेल ब्रिजला खालच्या बाजूने असंख्य लहान-मोठ्या भेगा गेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून क्रेनच्या साहाय्याने खालील बाजूस मटेरियल भरण्याचे काम सध्या संबंधित ठेकेदाराकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र, महामार्गासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, हे काम पूर्णपणे 'रामभरोसे' सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये सुरू आहे.
दुरुस्तीचे काम सुरू, पण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोवा दिशेने जाणाऱ्या लेनवर हा बॉक्सवेल ब्रिज येतो. या पुलाच्या खालच्या स्ट्रक्चरला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, पुलाची ही दुर्दशा पाहून नागरिक हादरले आहेत. पुलाला पडलेल्या या धोकादायक भेगा आणि तडे लपवण्यासाठी किंवा तात्पुरता मलम लावण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने खालील बाजूस सिमेंट-मटेरियल भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, हे तांत्रिकदृष्ट्या किती सुरक्षित आहे आणि यामुळे पुलाच्या ताकदीवर काय परिणाम होईल, याबाबत शंका वाटत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग चाकरमानी आणि पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून दिवस-रात्र अवजड वाहने आणि हजारो छोटी-मोठी वाहने धावतात. अशा वर्दळीच्या ठिकाणच्या पुलाला तडे जाणे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचा चर्चा नागरिक करत आहेत.
"पुलाला पडलेल्या मोठ्या भेगा आणि तडाखा पाहता, केवळ वरवरची मलमपट्टी करून पुलाचे आयुष्य वाढणार नाही. निकृष्ट कामामुळेच अवघ्या काही वर्षांतच पुलाची अशी अवस्था झाली आहे," अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








