LIVE UPDATES

५७ कोटींच्या नळपाणी योजनेचा ऑडिट रिपोर्ट सादर

ऑडीट करणारे प्राध्यापक सभेस अनुपस्थित ; भाजप नगरसेवक ॲड. भांबुरेंनी घेतला आक्षेप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 23, 2026 03:01 PM
views 86  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या ५७ कोटींच्या योजनेचा थर्ट पार्टी ऑडिट रिपोर्ट विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणेकडून योजनेतील बांधकाम समाधानकार असल्याचा रिपोर्ट दिला असून त्यानुसार थांबलेल्या कामास पुन्हा सुरुवात होणार आहे‌.

८ डिसेंबर २०२६ पर्यंत योजनेची मूदत असल्याने जानेवारीच्या आत काम पूर्ण करण्याचे नियोजन न.प. प्रशासन, पीएमसी व ठेकेदाराकडून करण्यात आलेय. आजच्या सभेत सर्वानुमते याला मंजूरी देण्यात आली. मात्र, भाजप नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी ऑडीट करणारे प्राध्यापकच अनुपस्थित राहिल्याने आक्षेप नोंदवला. तर अहवातील काही पानच उपलब्ध नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली‌. यावेळी ऑनलाईन पद्धतीने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच १४ निरीक्षण करून अहवाल देणारे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणेचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेडाऊ सभेला अनुपस्थित राहिल्याने भाजप नगरसेवक ॲड‌. सिद्धार्थ भांबुरे यांनी जोरदार आक्षेप घेतला.

जर अहवाल करणारे प्राध्यापकच नसतील तर प्रश्नांची उत्तरे देणार कोण ? ठेकेदार आणि पीएमसीला काय विचारायच ? असा सवाल त्यांनी केला. तसेच या अहवालात काही पानेच नसुन अर्धवट अहवाल ऐकून काय करायचं ? अहवाल रद्दी वाढवायला दिले का ? असा सवाल केला‌. शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर, ॲड. सायली दुभाषी यांनी देखील यावर आवाज उठवला.

यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी मुख्याधिकारी म्हणून तुम्ही लक्ष देत नाही का ? प्रत्येकवेळी दुसऱ्यावर का ढकलता ? अशा शब्दांत त्यांनी खडेबोल सुनावले. तर उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी लोकांना पाणी पुरवठा होण आवश्यक असून वेळेत योजना पुर्ण करण्यासाठी नियोजन करा, वारंवार बैठका नको. रत्नागिरीच्या योजनेसारख काम नको असे त्यांनी म्हटले. यावेळी नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत पीएमसी, ठेकेदाराचे इंजिनिअर यांना अहवाल व नियोजनाचे सादरीकरण करण्यास सांगितले. 

यावेळी नगरसेविका वीणा जाधव यांनी खोदलेले रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार ? लोकांचे पडून अपघात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नगरसेवक अजय गोंदावळे, नीलम नाईक, तौकीर शेख, आनंद नेवगी यांनी पुढील काम करत असताना त्याठिकाणी योग्य पद्धतीने नियोजन व्हाव, लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टसाठी नेमलेल्या माणसांकडून काम समाधानकारक असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे यावर अधिक चर्चा न करता काम व्यवस्थितपणे पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळाव यादृष्टीने प्रयत्न व्हावे असे नमूद केले. 

दरम्यान, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी कोल्ड मिक्सने झालेल्या कामाच्या ठिकाणी हॉट मिक्सने पुन्हा काम होईल. वेळेत योजना पूर्ण करण्यासाठी आपल नियोजन असल्याचे त्यांनी म्हटले. तर मुख्याधिकारी यांनी उर्वरीत ५२ टक्के काम पूर्ण करण्यासाठी ६ टीम नेमल्या असून यात २ प्लंबर, ४ सुपर व्हायजर, ३ इंजीनियर अशी टीम असणार असून बारचाट नुसार जानेवारी महिना अखेरपर्यंत काम पूर्णत्वास येईल असं सांगितलं. आजमितीस २७ कोटी रूपयांचे बील अदा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्ताधारी, विरोधी नगरसेवक उपस्थित होते.