
सिंधुदुर्गनगरी : जगात भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक संकटांचा परिणाम होऊनही भारताकडे गरजेपेक्षा तिप्पट अन्नसाठा आहे. सर्विसेस म्हटलं की फक्त सॉफ्टवेअर वाटतं, पण प्रत्यक्षात 30-35 प्रकारच्या सर्विसेसमध्ये भारत खूप पुढे गेला आहे. आज आपण मोबाईलवरून पेमेंट करतो, ही अद्ययावत व्यवस्था युरोपमध्येही नाही. भारताने सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल स्वीकारले आहे."गेल्या काही वर्षात 55 कोटी नवीन बँक खाती उघडली गेली आणि हजारो कोटी रुपये या छोट्या खात्यांमध्ये जमा झाले. आयुष्मान भारत, अटल पेन्शन योजना, विमा योजना यांसारख्या योजनांमुळे सामान्य माणूस आर्थिक प्रवाहात आला आहे. पुढच्या काळात ग्रामीण भागाच्या ग्रोथसाठी PACS आणि सहकारी संस्था सक्षम करणे, नवीन संस्था स्थापन करणे गरजेचे आहे."असे प्रतिपादन सतिश मराठे यांनी ओरोस येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण सहकार संवाद’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, ओरोस येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक मा. सतीश मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाचे संचालक तथा सहकार भारती कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, जिल्हा बँक मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सहकार भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांसमोरील वर्तमान समस्या, नव्या संधी, संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दिशा, बदलत्या आर्थिक परिस्थितीतील आव्हाने तसेच सहकारातून ग्रामीण विकासाला मिळणारी नवी गती यावर या संवादामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेती, मत्स्य, काजू, दुग्ध, पर्यटन, ग्रामीण उद्योग तसेच विविध सहकारी संस्थांना भविष्यात अधिक सक्षमपणे वाटचाल कशी करता येईल याबाबत विचारमंथन झाले. यावेळी बोलताना सतीश मराठे पुढे म्हणाले, "आपल्या जिल्ह्यात आपण काय करू शकतो याचा सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नव्याने स्थापन झालेली ‘त्रिभुवन’ सहकारी युनिव्हर्सिटी यामध्ये खूप मोठं काम करू शकते. या युनिव्हर्सिटीने 50 हून अधिक कोर्सेस तयार केले आहेत. शॉर्ट टर्म सर्टिफिकेटपासून ते डिग्रीपर्यंतचे कोर्सेस आहेत. सरकार, सहकारी संस्था आणि सामाजिक संस्था एकत्र आल्या तर हे काम अधिक गतीने होईल आणि ग्रामीण बँकांचा वाटा देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणात वाढेल."सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, मच्छीमार, काजू उत्पादक व युवा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










